Wed, Mar 4, 2026
सातारा जिल्हा

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतला सातारा नगर परिषद प्रकल्पांचा आढावा

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतला सातारा नगर परिषद प्रकल्पांचा आढावा
Ashok Ithape
  • PublishedDecember 7, 2023

पाणीगळती रोखण्यासाठी सर्व नळजोडांना मीटर बसवावेत- पालकमंत्री शंभूराजे देसाई

सातारा, दि.५: शहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पाणीपुरवठा योजना, वितरण वाहिन्या आदींचे व्यवस्थापन करण्यासह पाणीगळती रोखण्यासाठी सर्व नळजोडांना मीटर बसविण्याचे नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा नगर परिषदेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, सातारा नगर परिषद मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर परिषद प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, यावर्षी धरणांतील पाणीसाठ्याची गंभीर परिस्थिती असून पुढील काळात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कास तलावात पुरेसे पाणी असेल तरी त्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे झाले पाहिजे. पाणी गळती होऊ नये यासाठी सर्व शहरात नळजोडांना मीटर बसवणे आवश्यक आहे.

शहरात स्वच्छ्ता राखण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी कचरा व्यवस्थापन योग्यरित्या करावे. भुयारी गटार योजना शहराच्या ठराविक भागात न करता संपूर्ण शहर समाविष्ट होईल अशा प्रकारे राबवावी. त्यासाठी उर्वरित भागाचा प्रस्ताव तातडीने तयार करून सादर करावा, असेही पालकमंत्री म्हणाले.

शहर सौंदर्यीकरण प्रकल्पांचा आढावा घेताना श्री. देसाई म्हणाले, उड्डाण पुलांच्या खालील भागांचे सौंदर्यीकरण करत असताना वृद्ध, बालके यांना रस्ता सुरक्षितपणे ओलांडता येईल याचाही विचार करावा.

यावेळी श्री. बापट यांनी सादरीकरण करून नगर परिषदेच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. कास धरणाची उंची वाढविण्याचे काम झाले असल्यामुळे कास मधील पाणी संपूर्ण शहरासाठी येणार आहे. अमृत २.० अंतर्गत जल विद्युत प्रकल्पाचे काम गतीने सुरू आहे, प्रस्तावित कास पाणी पुरवठा योजना, शहर सौंदर्यीकरण, गोडोली तळे खोलीकरण, सौंदर्यीकरण, अजिंक्यतारा रस्ता विकसित करणे आदी प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!