वाई जिमखान्याने वाईचा लौकिक वाढविला : सौ. तेजस्विनी भिलारे
![]()
खेळाडूंच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वाईकर थरारले
वाई : स्व. आनंदराव कोल्हापुरे यांनी स्थापन केलेल्या वाई जिमखान्याने तब्बल 50 हून अधिक राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू निर्माण करुन वाईचा लौकिक वाढविला आहे. वाई सारख्या मोठी परंपरा असणार्या शहरात क्रीडा चळवळीचा धगधगता यज्ञ त्यांनी निर्माण केला. तो यज्ञ कायम तेवत ठेवण्याचे काम या जिमखान्याचे सर्व पदाधिकारी व कोल्हापुरे कुटुंबिय ज्या तळमळीने करत आहेत ती तळमळ वाईकरांसाठीच नव्हे तर इतरही सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ. तेजस्विनी जतिन भिलारे यांनी वाई येथे केले.
वाई जिमखान्याच्या उन्हाळी शिबिर सांगता सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी जिमखान्याचे अध्यक्ष अॅड. रमेश यादव, उत्कर्ष पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा कोल्हापुरे, जतिन भिलारे, अमर कोल्हापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना भिलारे म्हणाल्या, या शिबिरात सहभागी झालेल्या मुला, मुलींसह जिमखान्याच्या खेळाडूंनी विविध मल्लखांबावरील सादर केलेल्या चित्तथरारक कसरती अंगावर रोमांच उभ्या करणार्या ठरल्या.
मुलींनी तर नऊवारी साडी नेसून हाती तलवार, मशाली घेवून जी प्रात्यक्षीकं सादर केली ती पाहता हिरकणी, झाशीच्या राणीच घडविण्याचे काम येथे होत असल्याचे दिसून आले. एवढी मोठी क्रीडा चळवळ वाईसारख्या छोट्या शहरात अन्यत्र क्वचितच कुठे पहायला मिळेल. त्यामुळे वाईत हे होत आहे याचा वाईकरांइतकाच आम्हालाही अभिमान आहे. आपल्या शहराचा क्रीडा क्षेत्रात लौकिक निर्माण व्हावा यासाठी आनंदराव कोल्हापुरे यांनी जे बीज रोवलं ते अगदी अस्सल आहे. जिमखान्याचे सर्वच उपक्रम अतिशय भारावून टाकणारे आहेत.
संस्थेची जीम, त्यामध्ये असणार्या सर्व अत्याधुनिक सुविधा, विशेषत: महिलांसाठीही ही जीम उपलब्ध करुन देत दाखवलेला दृष्टीकोन सर्वच कौतुकास्पद आहे. अशा प्रकारचे काम आमच्या इथेही उभं रहावं यासाठी कोल्हापुरे यांच्याकडून मार्गदर्शन घेवू, असेही तेजस्विनी भिलारे यांनी सांगून वाई जिमखाना म्हणजे वाईकरांची क्रीडा अस्मिता असून ती अधिकाधिक वृद्धींगत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू व पंच प्रसाद बेडेकर, शिबिरातील विविध कलागणुांचे प्रशिक्षक निलेश भारसकर, प्रणाली शिंदे यांच्या विशेष गौरवासह सर्व प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. सर्व सहभागी शिबिरार्थींना प्रशस्तीपत्र देवून गौरवविण्यात आले. यावेळी संजय कांबळे, वैभव फुले, श्रीकांत शिंदे, संतोष घोरपडे, योगेश देशमाने, किरण शिंदे, सुधीर मांढरे, अमिर बागुल, पांडुरंग भिलारे, जिमखान्याचे सर्व सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, पालक, वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ. प्रिती कोल्हापुरे यांनी प्रास्तविक केेले, राष्ट्रीय खेळाडू मनाली सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले, अॅड. रमेश यादव यांनी आभार मानले.
. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
अलोट गर्दी.. टाळ्यांचा कडकडाट..
वाई जिमखाना येथे अतिशय देखणेपणाने साजरा झालेल्या या कार्यक्रमास वाईकरांनी अलोट गर्दी केली होती. प्रारंभी शिबिरार्थींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करुन विविध मल्लखांबावरील प्रात्यक्षिके सादर करण्यास सुरुवात केली. अक्षरश: चिमुरड्या अशा 4 वर्षांच्या खेळाडूंपासून राष्ट्रीय खेळाडूंनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना श्वास रोखून धरायला लावले. हाती तलवारी व मशाली घेवून तसेच नऊवारी साडीतही मुलींनी सादर केलेल्या मल्लखांबावरील प्रात्यक्षिके पाहून अलोट गर्दीने टाळ्यांचा एकच कडकडाट केला.
प्रसाद बेडेकर यांचा सत्कार झाल्यानंतर राष्ट्रीय खेळाडू, पंच व प्रशिक्षक रंगता बेडेकर यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतरही एकच जल्लोष झाला. अशा जल्लोषी वातावरणात यंदाच्या शिबिराची सांगता झाली असली तरी अनेक चिमुरड्यांना हे शिबिर कायमचे मैदानाशी जोडणारे ठरल्याचेच स्पट झाले आणि त्याचा आनंद अनेक पालकांच्या चेहर्यावर झळकताना दिसून आला.













