युवा महोत्सव यशस्वीतेसाठी यंत्रणांनी समन्वय राखावा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
सातारा दि. 21 :
युवकांचा सर्वांगीण विकास, संस्कृती व परंपरा यांचे जतन, युवकांच्यामधील सुप्त गुणांना वाव व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी जिल्हा व विभागस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी जिल्हास्तरासह विभागस्तरीय युवा महोत्सव सन 2023-24 चे आयोजन सातारा जिल्ह्यात करण्यात येणार असून हा युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
जिल्हास्तर व विभागस्तर युवा महोत्सव सन 2023-24 समितीची, तसेच जिल्हा क्रीडा परिषद समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला क्रीडा उपसंचालक माणिक वाघमारे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष घोषीत केलेले आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवात राज्यासाठी तृणधान्य वाढीसाठी विज्ञानाचा वापर आणि सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारित जिल्हा, विभाग व राज्यस्तर युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यानुसार 2023-24 या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
याबरोबरच या बैठकीत जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत आयोजित होणाऱ्या स्पर्धांच्या आयोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. जिल्हा क्रीडा परिषदेमार्फत तालुकास्तर, जिल्हास्तर व विभागस्तर स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. शासनामार्फत राज्यस्तरावर स्पर्धा आयोजनाची जबाबदारी विविध जिल्ह्यांवर सोपविण्यात येते. सन 2023-24 साठी 14 व 19 वर्षाखालील मुले व मुली यांची लॉनटेनिस स्पर्धा, 14 ,17 व 19 वर्षाखालील मुले व मुली यांची थ्रो बॉल स्पर्धा आणि सॉफ्ट टेनिस स्पर्धा या खेळांच्या राज्यस्तरीय क्रीडा आयोजनाची जबाबदारी सातारा जिल्ह्याकडे देण्यात आलेली आहे. या स्पर्धेकरिता राज्यातील आठ विभाग सहभागी होणार आहेत.













