प्रेरणा संवादाच्या बालमित्रमैत्रिणींना करहरच्या नेचर केअर टेकर संस्थेने दाखविले भविष्याचे अचूक वेध
![]()
मनुष्य आणि प्राणी हीच जिवाभावाची माणसं असतात, याचा मिळाला ताक्ताळ दाखला
निर्मळ मन, स्वच्छ बुद्धी आणि कधी न कमी होणाऱ्या कार्यशक्तीला बळकटी देण्यासाठी ज्या भावनेतून, दूरदृष्टी विचारांतून आणि भविष्याचा अचूक वेध घेण्यासाठी प्रेरणा संवादने जे पाऊल टाकले ते नक्कीच दिशादर्शक आहे, होते आणि कायमच राहणार आणि त्याचीच सर्वांगसुंदर प्रचिती काल प्रेरणा संवादाच्या बालमित्रमैत्रिणींना दिसून आली, आणि सर्वांसाठी तो हा दिवस खरोखरच दुग्धशर्करा योग म्हणावाच लागेल.
कोणत्याही उपक्रमाचे सूक्ष्म नियोजन करणारे आपल्या ग्रुपचे सदस्य श्री रमेश गायकवाड सर विवर ता.जावली येथे प्राथमिक शाळेवर कार्यान्वित आहेत आणि त्यांच्या सहवासात नेचर केअर टेकर विवर, करहर ग्रुप असल्याने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात असलेली दिशादर्शक वाटचाल, निसर्गाची काळजी घेऊन त्यावर सर्वार्थाने प्रेम करणारी टिम म्हणून असलेली ओळख आणि त्यांचे दिवसरात्र थक्क करणारे काम यांची पुसटशी ओळख आपले मार्गदर्शक डॉ श्री मोहन सोनावणे सर यांना दिली त्याच बरोबर उंच डोंगरावर वसलेले आखणी गावाचे वेगळेपण आणि आजूबाजूचा परिसर याचा दाखला दिला त्यामुळे डॉ सोणावने सरांनी आपल्या प्रेरणा संवादाच्या बालमित्रमैत्रिणींना या प्रत्यक्ष ठिकाणी भेट देण्यासाठी तात्काळ नियोजन केले आणि म्हणतात ना चांगल्या गोष्टी घडताना काहीतरी चांगलं सर्वांगसुंदर घडत असतं, असाच या प्रत्यक्ष ठिकाणी भेट देताना आलेले एकत्र म्हणजे अगदी दुग्धशर्करा योग घडून आला.
ज्यांनी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे नवनवीन संशोधन केले, तसेच पुणे बाणेर येथे लाखो झाडांची लागवड करून त्यांच्या संगोपनाबरोबर कार्बन न्युट्रल, स्वच्छ पाणी, तलाव आणि नदी स्वच्छता मोहीम यासारखे दूरदृष्टी दर्जेदार उपक्रम राबवून समाजामध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणणारे आणि पाचवड ता. वाई येथे देवराई प्रकल्प यशस्वी राबविणारे श्री अनिल (बापू) गायकवाड यांचा प्रत्यक्ष असलेला सहभाग हा नवा उर्जा देणारा ठरला. तसेच इंजिनिअर श्री योगेश गायकवाड यांचाही सहभाग होता.
विवर, आखेगणीचा आधारवड असलेला डोंगर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे आणि बाजूला महू आणि हातेगर असलेले धरण वैभवात भर घालत आहे आणि त्यातून निसर्गाचे सौंदर्य उजळून निघताना त्याला वणवा लावणारा, वृक्षतोड करणारा आणि मुक्या प्राण्यांची शिकार करून त्याचा नामशेष करून त्या निसर्ग सौंदर्याच्या पोटाला बाधा निर्माण करणाराही आपलाच मनुष्यप्राणी आहे, आणि हेच दु:ख जाणणारे, तळमळीने अहोरात्र राबणारे आणि वेळप्रसंगी जीवाची बाजी लावणारे विवरचे मर्द मावळे पुढे सरसावयतात म्हणूनच टप्प्या टप्प्यावर निसर्ग आजही उजळून निघताना दिसतोय, फुलतोय, बहरतोय आणि वाढीसही लागतोय.
डोंगर चढाई करताना त्याच गावातील दहा पाऊले पुढे चालून आम्हाला रस्ता दाखवणारा मोत्या आम्हाला पुन्हा मागे फिरे पर्यंत सोबतीला होता, मनुष्य प्राण्यांचे नाते किती सलोख्याचे आहे हेच तो टप्या टप्प्यावर दाखवून देत होता.
नेचर केअर टेकर विवर, करहर येथील संस्था संपूर्ण महाराष्ट्रात आपल प्रामाणिक, निस्वार्थी आणि दूरदृष्टी काम करित आहे आणि आपल्या प्रत्यक्ष कामाची खरी ओळख बालमित्र मैत्रिणींना या संस्थेचे अध्यक्ष श्री गणेश गोळे सर, श्री गुरुदत्त पार्टे सर आणि श्री मयुर पार्टे सर यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून माहिती करून दिली.
सेंद्रिय शेती, राष्ट्रीय पक्षी, प्राणी आणि फूलांची ओळख करून देताना निसर्गाच्या सानिध्यात यांच अस्तित्व आणि या अस्तित्वातून मानवजातीला होणारा फायदा, शुद्ध हवा, पाणी, अन्न किती मोठा आहे पण काळाच्या ओघात डोंगरांना लागणारे, लावले जाणारे वणवे, होणारी वृक्षतोड, प्रदूषित होणारी हवा, नामशेष होत चाललेले पशूपक्षी आणि निसर्ग सौंदर्य पुन्हा हवे असल्यास आपल्याला योग्य ती पाऊले उचलून प्रत्यक्ष काम करून जतन करावेच लागेल नाहीतर, प्लॅस्टिक भात, केमिकल युक्त भाजीपाला आणि मिश्रित पाणी यांचे सेवन करून गंभीर आजारांना आमंत्रण हीच आपली ओळख राहिल.
हे ज्या पोटतिडकीने, आपुलकीने आणि विश्वासाने सांगताना बालमित्र मैत्रिणीं हेच उद्याच सुंदर भविष्य आहे ते फुललं तर आणि तरच निसर्ग बहरेल, पशूपक्षी आनंदतील आणि मानव जात वर्षानुवर्षे निरोगी राहिल.
दिपक पवार, चिंधवली.













