Mon, Mar 2, 2026
कलाकार कट्टा मनोरंजन

कितीदा तुला नव्याने आठवावे.. डोळ्यातील पाणी नव्याने वहावे

कितीदा तुला नव्याने आठवावे.. डोळ्यातील पाणी नव्याने वहावे
Ashok Ithape
  • PublishedNovember 3, 2023

एखाद्या कवितेच्या, गाण्याच्या ओळी शब्दशः अनुभवणे काय असते त्याचा अनुभव 12 th फेल हा सिनेमा पाहताना आला.

IPS मनोज शर्मा यांच्या जीवनावर आधारीत या सिनेमाला विधु विनोद चोप्रा यांचा परिसस्पर्श झालाय.

हा सिनेमा इतका वास्तवदायी आहे आणि UPSC करणाऱ्यांचा प्रवास IFS राजेश स्वामी यांच्या निमित्ताने इतका जवळून पाहिला आहे, की त्यामुळे तो अधिक भावला. सिनेमा पाहताना अनेकदा नव्याने आठवला तो राजेश. हा सिनेमा पाहताना त्याच्या आठवणीने डोळ्यातून पुन्हा पुन्हा पाणी वाहिले.

सिनेमा पाहून आलो आणि अर्ध्या तासात बाबुराव शिंदे सरांचा फोन आला. म्हटले, राहुल 12th फेल पहा. मी म्हटलं, सर आत्ताच पाहून आलो.  मग खूप बोलणं झालं. त्यांच्यासारखाच अनेकांना वेड्यासारखा सांगत सुटलो, 12th फेल बघा. रेवाला म्हटलं एक दिवस कॉलेज बुडलं तरी चालेल पण पहाच.

आधीच म्हटलं अत्यंत वास्तवदायी सिनेमा. यातील एक प्रसंग फक्त सांगतो. तो म्हणजे, दीड लाख घेऊन एका खाजगी कोचिंग क्लासला त्यांचा विद्यार्थी असल्याची जाहिरात करण्याची परवानगी IAS दीप यांनी दिलेली असते. त्यावर नायक या खोटेपनावर आक्षेप घेतो तो हा प्रसंग.

UPSC तून राजेशचे नुकतेच सिलेक्शन झाले होते. आणि काही दिवसातच मेडिकलसाठी दिल्लीला जायचे होते. राजेश सोबत  आणखी सहा जण आणि मी झेलम एक्सप्रेसने पुण्यातून दिल्लीला गेलो. ते सारे अभ्यास करताना पासूनचे ओळखीचे. त्यामुळे त्या गोतावळ्यात परकं वाटत नव्हतं. राजेश व इतर ते IAS, IPS तेवढी काळजी घेत होते.

सिलेक्शन झाल्याने उजळलेल्या त्या सर्वांच्या चेहऱ्यानी जणू उत्तेरेकडे नव्हे तर पूर्वेकडे सुरू केलेला तो प्रवास होता.

दिल्लीत पोहोचल्यावर राजेशकडे एका स्पर्धा परीक्षेच्या मासिकाचे लोक आले. तेव्हा आम्ही दोघेच होतो. तर त्यांनी दोन लाख देऊ केले राजेशला. त्या बदल्यात राजेशने एवढंच सांगायचे होते की UPSC करताना त्यांच्या मासिकाचा फायदा झाला. राजेशने क्षणात ती ऑफर नाकारली. तीच नव्हे तर त्यासोबत इतर कोचिंग क्लासचीही अशीच लाखो रुपये आमिषाची ऑफर त्याने त्याच दिल्ली भेटीत नाकारली.

हे असं आणखी कितीतरी प्रत्यक्ष पाहिलेलं, अनुभवलेलं. तेच सारं या सिनेमात पहायला मिळालं.
हा सिनेमा पहा हा आग्रह आहे त्यासाठीच. मात्र तो पाहून आपल्या लेकरा बाळांवर उगाच अपेक्षेचे ओझे लादू नका. मनोज शर्मा बघा संडास साफ करून, शिपायाची नोकरी करून, पिठाच्या चक्कीत काम करून IPS झाले मग तुम्हाला काय धाड भरलीय? असलं उगा वेड्यासारखे पोरांना सुनावू नका.
कारण,
यातील एका प्रसंगात जे सांगितलं आहे तेच राजेशनेही सांगितलं होतं. पुन्हा अपयश आल्यानंतरही पुन्हा रिस्टार्ट करणाऱ्या राजेशला मी विचारलं होतं, की एवढी लाखों पोरं करतात अभ्यास त्यातून मूठभर सिलेक्ट होतात. त्यात परत नाही नंबर लागला तर? त्यावर राजेश म्हटला होता, या अभ्यासातून जे ज्ञान मिळतं ना ते आयुष्यभरासाठी पुरेसं आहे, त्याने होणारी जडणघडण महत्वाची.

हा विचार महत्वाचा आहे, त्यासाठी हा सिनेमा पहा, आपल्या पोरांना दाखवा.

त्याच दिल्ली भेटीत आम्ही दोघेच राजघाटावर गेलो. महात्मा गांधींच्या समाधी परिसरात हिरवळीवर बसलो होतो. कीत्ती शांत, निवांत, निवळल्या आभाळासारखा वाटत होता राजेश. गेल्या अनेक दिवसांची लढाई जिंकली होती, त्या लढाईतील जखमा सुगंधी झाल्या होत्या.

तिथं तो म्हटला, मी आता जगभर फिरणार, ज्या ज्या देशात जाईन त्या त्या देशात तू यायचं. ते केवळ म्हणून थांबला नाही तर ते प्रत्यक्षात साकारलं. इजिप्त, केनिया, थायलंड अशा प्रत्येक ठिकाणी जाता आलं, संजीवनी वहिनींनी त्यावेळी केलेलं अगत्य आपलेपणाची जाणीव देणारं होतं. राजेशच्या कर्तबगारीसोबत त्या अगत्याचीही नोंद त्यामुळेच परवा मसुरीत IFS अभयकुमार यांनी घेतली. त्यातून सारी कल्पना यावी. तर त्या आपलेपणातून आलेल्या आत्मविश्वासाच्या बळावर मग एकटाही अनेक देश फिरलो. असं बळ संपूर्ण जगण्यासाठी माझ्या उणिवा झाकोळून आत्मविश्वास देणारं ठरलं. त्याचंही उदाहरण सांगायचं तर मी दहावीत गणितात फेल झालो. पुढे राजेश UPSC चा अभ्यास करू लागल्यावर एके दिवशी हाताला धरून मला सातारला नेले. मुक्त विद्यापीठाच्या पदवीच्या प्रवेश परीक्षेला बसवले. माझा पेपर होईपर्यंत तो कला वाणीज्य कॉलेजच्या दारात थांबला होता. मी ती परीक्षा पास झालो आणि B A प्रवेशासाठी साठी पात्र ठरलो. त्याला माझ्या कमी शिक्षणाची लाज वाटत नव्हती तर माझी कुवत वाढवायचा त्याचा तो प्रयत्न होता. ती वाढेल हा मला नव्हता पण त्याला विश्वास होता.

तेच सारे धागे या सिनेमाभर पसरले आहेत. तेच धागे या सिनेमाने उसवलेही आणि घट्ट बांधलेही.

हा सिनेमा केवळ यशाचा धगधगता प्रवास नाही तर तो नात्यांच्या जबाबदार जाणिवा घट्ट करणारा प्रवास आहे. मग ते कुटुंब असो मैत्री असो किंवा प्रेम असो.

या प्रत्येक पातळीवर राजेश प्रचंड तोलामोलाचा होता. ते मोल नव्याने जाणवले, सिनेमा पाहताना डोळ्यातून वाहिले.

राहुल तांबोळी, भुईंज

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!