किसन वीर व किसन वीर-खंडाळ्याचा पहिला हप्ता २८०० आमदार मकरंदआबा पाटील; एफआरपीप्रमाणे अंतिम दर देणार
दि. २ : भुईंज येथील किसन वीर साखर कारखाना व खंडाळा येथील किसन वीर- खंडाळा साखर उद्योगाककडे सन २०२३-२४ या गळीत हंगामामध्ये गाळपाकरिता येणाऱ्या ऊसाला प्रतिटन २८०० रूपयांचा पहिला हप्ता जाहीर करून, एफआरपीनुसार जो अंतिम दर निघेल तो देणार असल्याची माहिती, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, कार्यक्षेत्रातील सभासदांनी मोठ्या विश्वासाने कारखान्याच्या संचालक मंडळाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत दिलेल्या भाग भांडवलामुळेच किसन वीर व किसन वीर-खंडाळा हे दोन्ही कारखाने सुरू करण्यात यशस्वी ठरलो. गळीत हंगाम सन २०२२-२३ मधील किसन वीरची प्रतिटन २६५० प्रमाणे होणारी रक्कम १२२ कोटी ४ लाख ४८ हजार २८१ रूपये व किसन वीर-खंडाळ्याची प्रतिटन २५०० प्रमाणे ३३ कोटी ६० लाख २९ हजार ४५४ रूपये होणारी एफआरपीची संपुर्ण रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभप्रसंगी दिवाळीनिमित्त ५० रूपयांचा हप्ता जाहीर केलेला असून त्याची होणारी २ कोटी ३० लाख २७ हजार ६६७ रूपयांची रक्कमही लवकरच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहोत.
अत्यंत अडचणीच्या काळात तसेच कोणत्याही बँकेचा एक रूपयाही न घेता आपण किसन वीरसाठी २७०० रूपये व खंडाळ्यासाठी २५०० रूपयांचा भाव देण्यात यशस्वी झालो आहोत. सध्या आपले दोन्ही कारखाने प्रतिकुल परिस्थितीतुन मार्गक्रमण करीत आहे, यावर आपण नक्कीच मात करून करणार अशी खात्री देत किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखान्याची जी अंतिम एफआरपी निघेल त्याप्रमाणे दर देणार आहोत. त्यामुळे आपला कारखानाही दरामध्ये मागे पडणार नाही, असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त करीत ऊस उत्पादक सभासदांनी कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता आपला संपुर्ण ऊस हा किसन वीर व किसन वीर- खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही प्रसिद्धीपत्रकाद्वारे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.













