Thu, Jan 15, 2026
कृषी वार्ता सहकार

किसन वीर व खंडाळ्यासाठी कसोटीचा काळ, मात्र मकरंद पाटील मार्ग काढतील आमदार रामराजे नाईक-निंबाळकर; गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात

किसन वीर व खंडाळ्यासाठी कसोटीचा काळ, मात्र मकरंद पाटील मार्ग काढतील आमदार रामराजे नाईक-निंबाळकर; गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात
Ashok Ithape
  • PublishedOctober 30, 2023

वाई / दि. ३० :

किसन वीर व किसन वीर खंडाळा हे दोन्ही कारखाने आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून भविष्यात नक्कीच फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल. किसन वीर व किसन वीर खंडाळा कारखान्यासाठी सध्याचा काळ कसोटीची असून यातूनही मकरंद पाटील निश्चितपणे मार्ग काढतील असा विश्वास विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.

भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते, किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील, सौ. अर्चनाताई मकरंद पाटील, सातारा जिल्हा बँकेचे चेअमरन नितिनकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

गव्हाणीचे विधिवत पुजन कारखान्याचे संचालक रामदास इथापे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनिता इथापे यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, वसंतराव मानकुमरे, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, नितीन भुरगुडे-पाटील, बाळासाहेब सोळस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार रामराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले की, आज जी व्यथा मकरंदआबा व नितीनकाका तुमची आहे. या व्यथेतून आम्हीही गेलेलो आहे, त्यामुळे तुम्हाला काय त्रास होत आहे याची जाणीव मला आहे. काही लोकांकडून चुकीच्या गोष्टी होत असतात आणि त्याच्या खस्ता पर्यायाने आपल्याला खाव्या लागतात. परंतु आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे तुमच्यावर असलेले प्रेम दिसून येते. त्यामुळेच दोन हंगाम झाले आपण एकाही बँकेचे कर्ज न घेता कारखाने सुरू केले. एवढेच नव्हे तर सर्व देणीदेखील दिलेली आहेत. सध्याच्या पिढीतील शेतकऱ्यांनही लक्षात घेतले पाहिजे की, आपल्या मागील पिढीतील लोकांनी त्यांच्या कष्टाच्या पैशावर या संस्था उभ्या केलेल्या आहेत, याची जाण ठेवली पाहिजे. सध्या कारखान्याची आर्थिक स्थिती व्यवस्थित नसली तरी आपण थोड्याशा अमिषापोटी बाहेर ऊस न घालता आपल्या संस्थेला घातल्यास भविष्यात आपली संस्था मोठी होऊन परिणामी दरही चांगला मिळण्यास मदत होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस किसन वीर व किसनवीर खंडाळा कारखान्याला घालण्याबाबतही त्यांनी आवाहन केले.

आमदार मकरंदआबा पाटील म्हणाले की, १९७२ साली कारखान्याचे संस्थापक किसन वीर व तत्कालीन सहकाऱ्यांनी जांबच्या माळावर कारखान्याचं रोपटं लावलेलं होतं. त्याचा आज कल्पवृक्ष झालेला आहे. किसनवीर आबांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भावनेतुन या कारखान्याची निर्मिती केलेली होती. धोम धरणाची निर्मिती झाल्यानंतर कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता वाढत गेली. कारखान्यावरही अनेक दिग्गजांनी नेतृत्व केलं. परंतु चुकीच्या हातात व्यवस्थापन गेल्यानं भ्रष्टाचार व अनियमितता सुरू झाली व कारखान्यावर ही वेळ आली. किसन वीरचा सभासदांचेही मी आभारी आहे कारण मागील एफआरपीची थकबाकी असतानादेखील भाग भांडवलाची रक्कम दिली. या रक्कमेमुळेच गेली दोन वर्ष बँकेचे कर्ज न घेता कारखाना सुरू करू शकलो. मागील हंगामातील एफआरपी व इतर सर्व देणी दिलेली आहेत आणि यामुळेच आपल्या कारखान्याची विश्वासर्हता वाढलेली आहे. तसेच कारखान्याची पतही निर्माण झालेली आहे. यंदाच्या वर्षी आपण दोन्हीही कारखाने पुर्ण क्षमतेने चालविण्याइतकी तोडणी यंत्रणा भरलेली आहे. दोन्ही कारखान्याचे गाळप पहिल्यादिवसापासून पुर्ण क्षमतेने होणार आहे याची खात्री सभासदांनी बाळगावी तसेच आपला संपुर्ण ऊस किसन वीर व किसन वीर खंडाळा कारखान्यास द्यावा, असे आवाहनही यावेळी आमदार पाटील यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, वसंतराव मानकुमरे, बाळासाहेब सोळस्कर, नितीन भरगुडे पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये सध्याच्या राजकारणाबाबत तसेच मकरंदआबांच्या पुढील राजकीय कारकिर्दीस व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आमदार मकरंदआबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मिरज व ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटल, शेंद्रे-सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कारखाना कार्यस्थळावर महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरासही कार्यक्षेत्रातील विविध गावातील जवळपास १४०० लोकांनी याचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध गावचे सरपंच, विविध गावचे कार्यकर्ते, शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

मकरंदआबांनी केली शेतकऱ्यांची दिवाळी गोड

किसन वीरच्या वार्षिक सभेमध्ये चेअरमन आमदार मकरंद आबा पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार असल्याची घोषणा केलेली होती. त्याप्रमाणे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिटन ५० रूपयांचा हप्ता देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे किसन वीर कारखान्याचा दर प्रतिटन रूपये २७०० झालेला आहे. या घोषणेमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!