‘किसन वीर’चा गळीत हंगाम शुभारंभ रविवारी
वाई / दि. २७ :
भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३ – २४ चा ५३ वा गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार (दि. २९) दुपारी ३ वाजता राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली, वाई – खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार, किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, २९ ऑक्टोंबर म्हणजे किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांचा वाढदिवस. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये रमणारा माणुस म्हणजे मकरंदआबा पाटील. यामुळे त्यांच्या वाढदिनी वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्यामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कार्यकर्ते करीत असतात. या दिनाचे औचित्य साधुनच कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ करण्याचे नियोजिलेले आहे. या दिवशी कारखाना कार्यस्थळावर मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये विविध प्रकारच्या आजारांचे निदान होऊन त्यावर मोफत उपचारही करण्यात येणार आहेत.
किसन वीर व किसन वीर- खंडाळा कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ नुकताच झालेला असून कारखान्यातील सर्व कामेही झालेली असून कारखाना गळीत करण्यासाठी सज्ज झालेला आहे. यानिमित्ताने सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस किसन वीर व किसन वीर -खंडाळा कारखान्यालाच गाळपासाठी देण्याचे आवाहनही केलेले आहे.
किसन वीर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभास कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी,
हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहनही व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व संचालक मंडळाने केले आहे.













