Thu, Jan 15, 2026
शेतीविषयक बातम्या सहकार

‘किसन वीर’ ची जबाबदारी पेलून कारखान्यास नवसंजीवनी देणार आमदार मकरंदआबा पाटील: बॉयलर प्रदिपन शुभारंभ दिमाखात संपन्न

‘किसन वीर’ ची जबाबदारी पेलून कारखान्यास नवसंजीवनी देणार आमदार मकरंदआबा पाटील: बॉयलर प्रदिपन शुभारंभ दिमाखात संपन्न
Ashok Ithape
  • PublishedOctober 25, 2023

वाई / दि. २५ :

किसन वीर व किसन वीर खंडाळा कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी आमच्या व्यवस्थापनावर विश्वास टाकून भरघोस मतांनी निवडुण दिले. भ्रष्ट कारभारामुळे विरोधकांनी केलेली कारखान्याची अवस्था ही दयनीय होती. यातून आपल्या सर्वांच्या विश्वासाच्या जोरावर मार्ग काढणार असून दिलेली जबाबदारी पेलून किसन वीर व किसन वीर खंडाळा कारखान्यास लवकरात लवकर नवसंजीवनी देणार असल्याची ग्वाही वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार मकरंदआबा पाटील यांनी दिली.

भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३ २४ च्या गळित हंगामाचा बॉयलरचे विधिवत पुजन कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद रावसाहेब बाबुराव शिंदे व सौ. सुरेखा रावसाहेब शिंदे (अनवडी, ता. वाई), सुरेश कृष्णराव बाबर व सौ. सुनंदा सुरेशराव बाबर (किकली, ता. वाई), युवराज ज्ञानदेव पवार व सौ. मधुरंजना युवराज पवार (आरफळ, ता. जि. सातारा), लक्ष्मण साहेबराव भिलारे व सौ. वंदना लक्ष्मण भिलारे (अरबवाडी, ता. कोरेगांव), शिवाजी सर्जेराव तरडे व सौ. शकुंतला शिवाजी तरडे (बामणोली, ता. जावली ) या उभयतांच्या हस्ते झाले व बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद आबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. डिस्टीलरी बॉयलरचे पुजन कारखान्याचे संचालक सचिन जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शुभांगी सचिन जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, वाई तालुका सुतगिरणीचे चेअरमन शशिकांत पिसाळ, ज्येष्ठ संचालक बाबासाहेब कदम, नितीन भुरगुडे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार पाटील पुढे म्हणाले की, सहकारातील धुरीण व्यक्तिंनाही किसन वीरबाबत हा प्रश्न पडतो की, कारखान्याच्या परिसरामध्ये एवढा ऊस तसेच इतर प्रकल्प असतानादेखील कारखाना अडचणीत येतो कसा ? याचे उत्तर एकच पडते की मागील सत्ताधाऱ्यांनी कारखान्यावर केलेला भ्रष्ट कारभार. कारखाना ही स्वतः च्या घरची संपत्ती असल्यागत त्याचा वापर करणे. कारखान्यांच्या गाड्यांचा अमापपणे वापर, स्वतःच्या खाजगी कामाकरिता कारखान्याचा वापर करणे अशा अनेक कारणांमुळे कारखान्यावर ही वेळ आली. आपल्या कारखान्यावर किसनवीरआबा, डी. बी. कदम, सुरेश वीर, लक्ष्मणरावतात्यासारख्या मोठ मोठ्या दिग्गजांनी काम करून कारखान्यास उंचीवर नेहून ठेवलेले होते. स्व. तात्यांच्या काळात विरोधकांनी अपप्रचार करून सत्ता काबीज केली. सत्तेत आल्यानंतर सहकाराला काळीमा फासण्याचे काम तेवढे विरोधकांकडून झाले. यामुळे याचा परिणाम काय झाला ते आपण पाहत आहेच. याउलट आमचे व्यवस्थापन कारखान्यावर मिटींगला येताना आम्ही आमच्या स्वतःच्या गाड्यांनी येत असतो. कारखान्याचे डिझेलही घेत नाही तसेच अजुनही आमच्या व्यवस्थापनाने मिटींगचा भत्ताही घेतलेला नाही. मागील वर्षी कारखाना थोडा उशीरा सुरू झाला कारण मागील महाभागांनी कारखाना चालविला परंतु अंतर्गत कामेही केलेली नव्हती. त्यामुळे बॉयलर व अन्य कामांमुळे वेळ झाला. परंतु यावर्षी अंतर्गत कामे पुर्ण झालेली असुन निर्धारित वेळेतच कारखाना सुरू होणार आहे. दोन्ही कारखान्यांवर ३० टक्के यंत्रणा पोहोच झालेली आहे. उर्वरित यंत्रणाही लवकरच पोहोच होणार आहे. सभासदांनीही विचार केला पाहिजे की, ज्यावेळी कार्यक्षेत्रात ऊस कमी असतो त्यावेळी कोणताही कारखाना ऊस घेऊन जाऊ शकतो. परंतु ज्यावेळी ऊसाचे प्रमाण जास्त असते त्यावेळी फक्त आणि फक्त आपलाच कारखाना ऊस गाळपासाठी घेऊन जातो. त्यावेळी अगदी पाऊस जरी सुरू असला तरी कारखाना सभासदांचे नुकसान कधीच होऊ देत नसतो. त्यामुळे कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासदांनी आपला संपुर्ण ऊस किसन वीर व किसन वीर खंडाळा कारखान्यालाच गाळपासाठी द्यावा, असे आवाहन करून सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

प्रमोद शिंदे म्हणाले की, आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापनाचा हा दुसरा गळीत हंगाम आहे. यंदाचा हंगाम यशस्वी करण्यासाठी दोन्ही कारखान्यांची पुर्ण तयारी झालेली असून कारखाना गळीतासाठी सज्ज आहे. अतिशय प्रतिकुल परिस्थितीमध्ये आपण दोन्ही कारखाने सुरू केले हे आपणा सर्वांना माहित आहेच. मागील हंगामामध्ये शेतकन्यांचा जो शिल्लक राहिलेला ऊस होता. तो ऊस इतर कारखान्यांनी तोडला नाही तो आपल्या कारखान्यानेच तोडला व गाळप केले तेही सभासदांच्या हिताकरिता व त्यांचे नुकसान होऊ नये या सद्हेतूनेच आपण हे केलेले होते. कारखाना लवकरच सर्व अडचणीतून बाहेर पडणार असल्याचा विश्वासही श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.

सुत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले तर आभार संचालक दिलीप पिसाळ यांनी मानले. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सचिन साळुंखे, रामदास गाढवे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशिला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, बाजार समितीचे सभापती मोहन जाधव, संचालक पोपट जगताप, कांतीलाल पवार, जनता बँकेचे चेअरमन सुरेशराव कोरडे, राजेंद्र सोनावणे, बाळासाहेब जाधव, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती बाबर, अॅड. विजयसिंह पिसाळ, निवास शिंदे, माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, अनिल सावंत, शशिकांत पवार, पप्पु हगीर, अब्दुल इनामदार, सुजितसिंह जाधवराव, नारायण नलवडे, खंडाळा कारखाना संचालक डी. एम. भोसले, मदनराव भोसले, मधुकर भोसले, शामराव गायकवाड, नितीन निकम, सचिन तरडे, तानाजी शिर्के, मंगेश धुमाळ, मामा पाटील, सुनिल पोळ, संभाजी चव्हाण, नंदकुमार माने, युवराज कदम, संतोष पिसाळ, राजेंद्र जाधव, अयज भोसले, अंकुश कुंभार, मनिष भंडारे, संपतराव वाघ, कुमार बाबर, विजयराव शिंगटे, संजय साळुंखे, शिवाजीराव शेळके, सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकतें, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून काढणार आमदार मकरंदआबा पाटील

जोपर्यंत कारखान्याची परिस्थिती पुर्ववत होणार नाही. तोपर्यंत आपण इतर कारखान्यांएवढा चढा भाव देण्यात कमी पडणार आहोत. परंतु येणाऱ्या नजिकच्या काळात आपली परिस्थिती नक्कीच सुधारणार असून त्यावेळी सभासदांचे जे नुकसान होईल ते आपण नक्कीच भरून काढणार आहोत, याबाबत कोणीही मनामध्ये शंका बाळगु नये असेही आमदार मकरंद आबा पाटील यावेळी म्हणाले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!