सातारची वर्णे एक्स्प्रेस राजधानी दिल्लीत सर्वोत्तम
![]()
श्री राजेंद्र पवार यांची २१ किलोमीटर मध्ये सर्वोत्तम वेळ ,Vendanta Delhi Half Marathon 2023
वयोमानाला कोणतच बंधन नसतं, हे आवर्जून शिकायचं असेल तर मराठ्यांच्या सातारा राजधानीत यावं आणि तडक वर्णे अंगापूरला जावं, तिथे जाणून उमजून आणि आत्मसात करून घ्यावं.
आज दिनांक १५ ऑक्टोबर दिल्ली येथे वेदांता हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. आणि सरांनी या हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. त्यांच्याबरोबर सातारा येथील स.पो.नि.संदीप जाधव, शरद चव्हाण, निलेश माने, आशा माने, आल्मास मुलाणी, स्वाथम फिटनेस क्लबचे डॉ. दयानंद घाडगे, अविनाश सुतार, मच्छिंद्र फडतरे, राजेंद्र रासकर आदि सहभागी झाले होते.
ही स्पर्धा १:४९:४१ (एक तास एकोणपन्नास मिनिटे आणि एक्केचाळीस सेकंदात) पूर्ण केली. आजचे टायमिंग खूपच छान आले. आजच्या यशाचे श्रेय त्यांनी स्नेही, रनगुरु अल्ट्रारनर विशाल घोरपडे यांना समर्पित केले. त्यांनी वेळोवेळी सरांकडून सराव करुन घेतला. आज सरांचे मार्गदर्शक निलेश माने आणि डॉ. दयानंद घाडगे यांनीही या स्पर्धेत भाग घेतला होता.
सातारा येथील सर्वच स्पर्धकांनी अतिशय चांगली कामगिरी करुन देशाच्या राजधानीत सातारचा झेंडा फडकवला.
थोडसं श्री राजेंद्र पवार यांच्या बद्दल…
साखर झोपेत असणा-या सर्वांना प्रत्येक दिवसाचे महत्त्व, दिनविशेष याची सखोल माहिती दररोज न चुकता अखंडपणे पहाटे ४ वाजता सर्वांना देऊन, पुढे धावणे आणि योगा यांचा सराव करत स्वत:च स्वताचे विक्रम मोडीत काढून तरुणाईला लाजवेल एवढी प्रचंड उर्जा देणारे, चेहऱ्यावर आजही समाधानाचे तेज आणि शब्दांमध्ये तितकीच ताकद असणारे श्री राजेंद्र पवार सर.
ज्यांची ओळख विक्रमवीर म्हणून झाली ते पवार सर यांनी शेकडो मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग दर्शवून आपली जेष्ठत्वाची एक नाविन्यपूर्ण केली आहे, सुरवातीच्या काळात काही दिवस पोष्टात काम करत आपल्या वाटचालीला दिशा देण्याचे काम करत होते, पण त्याहूनही सर्व समावेशक, पोषक आणि भावी पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी स्विकारली, त्यानंतर शिक्षक ते मुख्याध्यापक असा प्रवास करत अनेक गोड, कटू आणि उर्जांवान गोष्टीतून शैक्षणिक उत्कृष्टरित्या मार्गदर्शन केले.
त्यानंतर सेवानिवृत्ती होऊन मन स्वस्थ बसू देत नव्हते आणि शारीरिक मानसिक स्वास्थ्य ही पुढे काळाची गरज ओळखून सातत्य हेच या शारीरिक कसरतीचे खरे मर्म आहे, म्हणून आजपर्यंत अनेक टप्यावरिल असणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून अनेक विक्रम प्रस्थापित केले, आणि नुसते विक्रम नव्हे, तर स्वतःच स्वताचे विक्रम मोडीत काढत स्वताला आज वयाच्या ६५ व्या वर्षी सर्वांना देतायत नवी प्रेरणा आणि नवी उर्जा. आणि आज राजधानी दिल्लीत सर्वोत्तम येऊन सरांची वर्णे एक्स्प्रेस किती वेगवान आहे हे दिसूनही आले आणि चर्चेतही राहिले.
गेल्या वर्षी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा ध्यास त्यांनी बाळगलेला होता आणि तब्बल ११० (एकशे दहा) दिवस साधारणतः ३२०० (तीन हजार दोनशे) किलोमीटर अंतर पायी तोडून नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली.
त्याचबरोबर प्रथित यशवंत, नामवंत आणि किर्तीवंत असणाऱ्या शिवकृपा पतपेढी, मुंबईवर सर विद्यमान संचालक आहेत.
खरचं अशी सरांसारखी माणसं पुस्तकाला शोभणारी असतात आणि वाचकांना सुशोभित करणारी असतात.
तुमच्या कर्तुत्वाला आमचा मानाचा मुजरा…
दिपक पवार, चिंधवली.













