Thu, Jan 15, 2026
अर्थ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवेचा शुभारंभ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या युपीआय सेवेचा शुभारंभ
Ashok Ithape
  • PublishedOctober 13, 2023

नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करा-अजित पवार

पुणे, दि. १३: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची युपीआय सेवा आणि पगारदारांकरिता अपघात विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला. बँकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. योग्य नियोजन तसेच उत्तम आणि पारदर्शक कारभाराद्वारे ग्राहकांचे समाधान होईल असे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला आमदार अशोक पवार, संजय जगताप, बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, रमेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, युपीआयसारख्या सुविधेचा वापर करून बँकेने आपण काळासोबत असल्याचे दाखवून दिले आहे. या सेवेमुळे ग्राहकांना एका क्लिकवर विविध सुविधा मिळू शकतील आणि बँकेत होणारी गर्दी कमी होईल.  बँकींग क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. अशावेळी व्यापारी आणि स्थानिक पतसंस्थांशी स्पर्धा करताना अनुकूल बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सातत्य ठेवावे.

बँकेने ग्राहक हित समोर ठेवून वाटचाल करावी. मोबाईल बँकीगमुळे या क्षेत्रात बदल होत आहेत. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांची भरती करताना नवे तंत्रज्ञान जाणणाऱ्या उमेदवारांची निवड करावी, स्थानिक उमेदवारांना यात प्राधान्य देण्यात यावे.  बँकेच्या शाखा वाढवून व्यवसाय वाढविण्यावर भर द्यावा. बँकेच्या विकासविषयक बाबी मार्गी लावण्यासाठी कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही श्री.पवार यांनी दिली.

पगारदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या अपघात विमा योजनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण मिळेल असे सांगून हे विमा संरक्षण ३० लाखाहून ५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्याबाबत संचालक मंडळाने विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. बँक कर्मचाऱ्यांनी कुटुंब आणि समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि ग्राहकांचे हीत जपण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी केले.

बारामतीच्या नागरिकांमुळे बँकेचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावता आला, बँकेमुळे सर्वांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यामुळे बँकेशी निगडीत घटकांचा कायम ऋणी राहील, अशा शब्दात त्यांनी बँकेविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.

प्रारंभी श्री.दुर्गाडे यांनी बँकेच्या प्रगतीविषयी माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नागरी सहकारी बँकांमध्ये पहिल्या पाचमध्ये पोहोचली आहे. बँकेच्या यूपीआय सेवेमुळे खातेदारांना त्यांच्या आर्थिक गरजेनुसार तात्काळ आणि सुरक्षितपणे व्यवहार करता येईल. अपघात विमा योजनेचा बँकेच्या सुमारे २६ हजार पगारदार खातेदारांना लाभ होणार असून त्यापोटी बँकेला १ कोटी ५५ लाख रुपये खर्च येणार आहे,  असे त्यांनी सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!