देगावच्या युवकांनी सामूहिक श्रमदानातून बांधला दगडी बंधारा.
![]()
देगाव, तालुका वाई येथील युवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनास प्रतिसाद देत श्रमसंस्काराचा दिला नवीन संदेश.
वाई / प्रतिनिधी :
“पाणी आडवा, पाणी जिरवा व पाणी वापरा” या तत्वास अनुसरून कृषी क्रांती घडविण्यासाठी उपयुक्त ठरणारे बंधारे बांधणे ही काळाची गरज आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत वाई तालुक्यातील देगाव येथील युवकांनी उत्स्फूर्तपणे सामूहिक श्रमदान करून गावातील घोकटा नावाच्या शिवारात दगडी बंधारा बांधून श्रमसंस्काराचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुष्काळ हटवून कृषी क्षेत्रात समृद्धता आणण्यासाठी श्रमदानातून बंधारे बांधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले होते. या आवाहनाला संपूर्ण जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याच अनुषंगाने वाई तालुक्यातही मोठ्या प्रमाणात काम झाले आहे. त्या शृंखलेत देगाव (ता. वाई) येथे घोकटा नावाच्या शिवारातील ओढ्यावर गावातील तरुणांनी श्रमदानातून दगडी बंधरा बांधला असून यापुढे जास्तीत जास्त बंधारे बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात जास्तीत जास्त बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पाणी वाहून जाऊ नये म्हणून ओडे, नाले. इत्यादी ठिकाणी बंधारे बांधून पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुका कृषी विभागाच्या सहाय्याने युवकांनी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वनराई बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवून ते जिरवण्याची मोहीम हाती घेतली आहे.
तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, मंडल कृषी अधिकारी नितीन रायकर, कृषी सहाय्यक परशुराम गवळी, विनोद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली देगावमधील भैरवनाथ सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच सर्व अबालवृद्धांनी विशेष परिश्रम घेऊन हा दगडी बंधारा बांधला.
वाई तालुक्याच्या पूर्वेकडील भागामध्ये असणाऱ्या देगाव या गावात घोकटा नावाच्या शिवारात दगडी बंधारा बांधण्यासाठी दिलीप इथापे, यश इथापे, निलेश पाटील, नाना इथापे, विकास सूर्यवंशी, गणेश इथापे, आदेश इथापे, राजेंद्र घाडगे, विशाल इथापे, बाळासाहेब इथापे, जगन्नाथ यादव, पोलीस पाटील राजेंद्र चव्हाण
आदी ग्रामस्थांनी विशेष योगदान दिले. त्यामुळे भैरवनाथ मंडळ व युवकांनी राबवलेल्या बंधारा बांधण्याच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.













