Thu, Jan 15, 2026
शिक्षण

भांडारकर संस्थेच्या सहयोगाने बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये “भारतीय ज्ञान पध्दती” वर आधारित अभ्यासक्रमाची सुरुवात

भांडारकर संस्थेच्या सहयोगाने बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये “भारतीय ज्ञान पध्दती” वर आधारित अभ्यासक्रमाची सुरुवात
Ashok Ithape
  • PublishedOctober 6, 2023

पुणे, दि. 6 –

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक मुख्य घटक असलेल्या ‘भारतीय ज्ञान पद्धती’ या विषयासाठी भांडारकर संस्थेने ‘वेदविद्या – वेद ते वेदांग’ हा वैदिक साहित्यावरील परिचयात्मक अभ्यासक्रम तयार केला असून तो बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून शिकविण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि कॉलेजचे प्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर यांनी आज येथे दिली.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था आणि बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या या अभ्यासक्रमास वाणिज्य शाखेच्या 120 विद्यार्थ्यांनी गेल्या सत्रात प्रवेश घेतला असून यंदाच्या शैक्षणिक वर्षात तेराशेहून अधिक विद्यार्थी यासाठी प्रवेश घेतील असा विश्‍वास यावेळी उभयतांनी व्यक्त केला.

अधिक माहिती देतांना पटवर्धन म्हणाले की, प्राचीन भारतीय परंपरेतील समृद्ध ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भांडारकर संस्था व बीएमसीसीने उचललेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भांडारकर संस्थेने विकसित केलेला ‘भारत-विद्या’ हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म डिजिटल शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रभावी माध्यम असून त्याद्वारे वैदिक साहित्यावरील सुरु झालेला हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे विशेष आकर्षण ठरला आहे.

यावेळी प्राचार्य लांजेकर म्हणाले की, संपूर्ण देशात नवीन शैक्षणिक धोरण अंमलात येण्याच्या दृष्टीने हे एक महत्वपूर्ण पाऊल ठरले आहे. आमचा हा प्रयत्न ‘भारतीय ज्ञान पद्धती’ बाबतच्या क्रेडिट्सच्या यशस्वी अंमलबजावणींपैकी एक आहे. हा अभ्यासक्रम बीएमसीसीच्या प्रा. राजश्री गोखले, प्रा. विजय दरेकर आणि भांडारकर संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधार वैशंपायन, भारतविद्या प्लॅटफॉर्मच्या सूत्रधार डॉ. गौरी मोघे व डॉ. मुग्धा गाडगीळ यांच्या अथक परिश्रमामुळे प्रत्यक्षात सुरु होऊ शकला आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी अवश्य संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!