तृतीयपंथीयांच्या समस्या व तक्रारींचे निवारणासाठी हेल्पलाईन कक्षाची स्थापना
सातारा दि.3 (जिमाका):
तृतीयपंथी यांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात हेल्पलाईन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.
या कक्षामार्फत जिल्हास्तरावर तृतीयपंथीय यांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करणे, तृतीयपंथीयांसाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे. महाविद्यालयांशी संपर्क साधून तृतीयपंथीय विदयार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविणे, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना तसेच शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करणे व त्याबाबतच्या अडचणी सोडविणे, शिधापत्रिका, मतदान कार्ड व आधार कार्ड काढण्यासाठी मदत करणे, केंद्र शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवून देणे तसेच शासनाने व समाज कल्याण आयुक्तालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचना इ. बाबींची जिल्ह्यातील तृतीयपंथी यांना सविस्तर माहिती देण्याबरोबरच त्यांच्या समस्या कक्षामार्फत सोडविण्यात येणार आहे.
हेल्पलाईन कक्षाशी संपर्क साधण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक ०२१६२-२९८१०६ असा आहे. तरी जिल्ह्यातील तृतीयपंथी यांनी अडीअडचणीबाबत कक्षाशी प्रत्यक्ष किंवा हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. उबाळे यांनी केले आहे.













