वाई तालुक्यात सर्वात मोठी असलेली भुईंज विकास सेवा सोसायटी हि आपले मोठेपण बदलत्या परिस्थित टिकवून आहे – सहकार तज्ज्ञ एम.आर.भोसले
भुईंज / प्रतिनिधी :
भुईंज विकास सेवा सोसायटी व दे. भ. पतसंस्थेने भुईज परिसराचे पावित्र्य आणि महात्म्य जपल्याने आजही सर्व सामान्यांच्या उन्नतीसाठी उपयोगी पडत आहेत याचा माझ्यासह अनेकांना नक्कीच अभिमान असेल या संस्था आहेत म्हणून सहकार चळवळ नव्यापिढीला अनुभवता येते हे जपण्यासाठी यापुढे दोन्ही संस्थांच्या सभासदांनी विश्वासावर प्रोत्साहन देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सहकार तज्ञ व दोन्ही संस्थांचे मार्गदर्शक एम. आर. भोसले यांनी केले.
भुईंज विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आणि देशभक्त आवासाहेब वीर बीगर ग्रामीण सहकारी पतसंस्था या दोन्ही संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकत्याच संपन्न झाल्या यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी चेअरमन सहकार तज्ञ व दोन्ही संस्थांचे मार्गदर्शक एम आर भोगले बोलत होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते मोहन उर्फ आबासाहेब भोसले होते.
यावेळी बोलताना एम.आर. भोसले पुढे म्हणाले की वाई तालुक्यात सर्वात मोठी असलेली भुईंज विकास सेवा सोसायटी ही आपले मोठेपण बदलत्या परिस्थितही टिकवून आहे. शेती आणि शेतकरी यांच्या उन्नतीसाठी नेहमीच खंबीरपणे आधार देत सहकार जपत आहे. तर देशभक्त आवासाहेब वीर पतसंस्था यांनीही चांगल्यारितीने कामकाज करून आपला आदर्श जपला आहे.
दोन्ही संस्थांचे सभासद व ग्रामस्थ यांनी वेळोवेळी दिलेले सहकार्य आणि प्रोत्साहन यापुढेही असेच लाभो अशा अपेक्षा व्यक्त करून त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
भुईंज सोसायटीचे सचिव संजय भोसले व देशभक्त आवासाहेब वीर पतसंस्थेचे सचिव संजय शिंदे यांनी अहवाल वाचन केले. टाळ्यांच्या गजरात सर्व विषयांना सभासदांनी मंजूरी दिली. सोसायटी चेअरमन मदन शिंदे व पतसंस्था चेअरमन विलासभाऊ जाधवराव यांनी संस्थेचा आढावा मांडला.
यावेळी सभेचे अध्यक्ष मोहन उर्फ आबासाहेब भोसले यांनी अध्यक्षीय भाषणात संस्थेचे पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर दोन्ही संस्थेचे संचालक पदाधिकारी, भुईंज ग्रामपंचायतीचे सरपंच विजय वेळे, माजी सरपंच अर्जुन भोसले, शेखर भोसले पाटील, महालक्ष्मी महिला पतसंस्थेच्या चेअरमन संजीवनी दळवी, माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव, गजानन भोसले यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी व सभासद शेतकरी ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.
सुत्रसंचालन उद्योजक अंकुशराव शिंदे यांनी केले.













