![]()
1 ते 7 ऑक्टोंबर 2023 वन्यजीव सप्ताहच्या निम्मित्ताने.. पर्यावरण अभ्यास, डॉ महेश गायकवाड यांचा लेख
वन्यजीव सप्ताह, एक ते सात ऑक्टोबर हा भारतभर वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. मात्र 1952 साली सुरू झालेला वन्यजीव सप्ताह आज सुद्धा बाल्यावस्थेतच काम करत आहे. शासन पातळीवर अर्थात वन विभागाला यासाठी कुठलीही आर्थिक मदत मिळत नसल्याने हा सप्ताह फक्त कागदावरती साजरा केला जातो. यासाठी शासन स्तरावर वनविभागाला कुठलिही आर्थिक मदत मिळत नाही. यामुळे वन अधिकारी याबाबतीत नाराज दिसून येतात. शासनाचे कुठलेही काम करायचं असेल तर फक्त पैसाच काम करतो अन्यथा कुठल्याही अधिकारी अथवा राजकारण्यांना आर्थिक उलाढाल नसेल तर कुठलाही इंटरेस्ट नसतो. असंच काही वन्यजीव सप्ताह साजरा करताना दिसून येतं.
वन्यजीव सप्ताहाला कुठेही गावोगावी परिसरातील वन्यजीवांविषयी माहिती देताना वनविभाग दिसून येत नाही. शिवाय यासाठी कुठलाही कार्यक्रम गावभरात राबवला जात नाही हे विशेष. आजही भारतभर अनेक वाड्या वस्त्यांवर आपला विभाग पोहोचलेला नाही आणि पोहोचलाय तो फक्त त्यांचा भ्रष्टाचार. कुठलाही सामान्य माणूस वनविभागा विषयी चांगले बोलताना दिसून येत नाही हे विशेष. काही अपवाद चांगले अधिकारी वगळता इथं चांगल्या अधिकाऱ्यांचा वानवाच दिसून लगेच. बहुतांश राजकीय लोकांबद्दल न बोललेलेच बरं इतके निर्लज्ज आहेत.
वन्यजीवांशी मैत्री करूया किंवा वन्यजीवांची मैत्रीशी संबंध जोडूयात अशा प्रकारची जनजागृती समाजात होणं अपेक्षित आहे, मात्र असे होताना दिसत नाही.
वन्यजीव हे फक्त वन विभागाचेच असतात असे मानणारा समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येतो. हे वन्यजीव आहेत म्हणूनच आपण जिवंत आहोत याची जाणीव माणूस विसरून गेलाय की काय असा प्रश्न निर्माण होत आहे.
कुठेही बिबट्या अथवा लांडग्यांचा हल्ला पाळीव प्राणी किंवा माणसांवर झाला की लगेच त्याला पकडून न्या, असा तकादा स्थानिक लोक लावतात, हे त्याचेच लक्षण आहे. वन्यजीव कोणालाही विचारून कुठेही जात नाहीत आणि त्यांनी जावं तरी का? वन विभाग हा फक्त वनांच संरक्षण करण्यासाठी नव्हे तर वनांबद्दल जन माणसात जनजागृती करण्यासाठी आहे हे विसरून गेलेला आहे.
इंग्रजांनी स्थापन केलेला वनविभाग आजही त्यांच्याच नियमाने काम करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे जनमानस आणि वनविभाग याचं नातं अतूट नाही ते तुटलेलेच आहे. यापुढे तरी वनविभागाने जागृत होऊन जनमानसात काम करून लोकांमध्ये वन्यजीवन काय आहे हे समजावून सांगणे नितांत गरजेचे आहे. अन्यथा वन्यजीव आणि शेतकरी संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे, अर्थात भविष्यात संघर्ष अटळ आहे.
अलीकडे तर द्राक्ष, बोर, ज्वारी, बाजरीचे पीक घेतल्यानंतर त्यावर फिश नेट टाकून कंनसांना आणि फळबागांचे संरक्षण केले जाते हे खूप घातक आणि निसर्ग विरोधी आहे.
आपल्या परिसरात असलेले वन्यजीवन म्हणजे नेमकं काय हे सुद्धा अजून अनेकांना माहित नाही, मात्र यामध्ये मुंगी पासून हत्तीपर्यंत असलेल्या सर्व जिवांना वन्यजीव म्हणावं.
मुंग्या, मधमाशा, वटवाघळ, साप, पक्षी, सरपटणारे प्राणी, कोल्हा, लांडगा, वाघ, तरस, बिबट्या, ससे, हरण, बेडूक, गांडूळ, कीटक असे नानाविध प्रकारचे वन्यजीव आपल्या परिसरात आढळून येतात. यात काही वन्यजीवांना वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण आहे तर काहींना अजूनही संरक्षण मिळालेले नाही. मात्र यासाठी वनविभागात कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नाहीत ही खरी शोकांतिका आहे.
वटवाघुळ, मुंग्या, मधमाशा, यासारख्या महत्त्वाच्या वन्यजीवांना आजही वन्यजीव कायदा 1972 नुसार संरक्षण देण्यात आलेले नाही, यावर आजपर्यंत एकाही वन अधिकारी ते सचिव ते मंत्री यावर चर्चा सुद्धा करत नाहीत हे या वन विभागाचं दुर्दैव म्हणावं लागेल.
आपल्या शेतीसाठी मुंग्या आणि वाळवी हे खत निर्मितीचे कारखाने आहेत. मात्र मुंग्या आणि वाळवी मारण्यासाठी शासनाचा शेती विभाग कार्यरत असतो हे दुर्दैव. यावर कुठलीही कारवाई वनविभाग करताना दिसून येत नाही कारण त्यांनाच मुंग्या आणि वाळवी विषय कसलीही माहिती नाही हे दुर्दैव.मात्र जनसामान्य लोकांनी तरी मुंग्या आणि वाळवी यांची वारुळे वाचवणं नितांत गरजेचा आहे. कारण मुंग्या आणि वाळवी जंगलाचे खरे डॉक्टर आहेत.
कुठली गोष्ट कुजल्यानंतरच किंवा वनस्पती आजारी पडल्यानंतरच त्याचे खतात रूपांतर करण्याचा अधिकार निसर्गाने त्यांना दिलेला आहे. पृथ्वीवर प्रति स्क्वेअर किलोमीटर 50 टन खत निर्मिती करण्याचे काम मुंग्या आणि वाळवी दरवर्षी नियमितपणे करत असतात.
मधमाशांमुळे आपण शेतीची उत्पादन क्षमता 30 ते 40% वाढवून, आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी खूप चांगल्या दर्जाचे अन्न आपण खातोय हे मधमाशींमुळे होतंय हे विसरू नये. डाळिंब, सफरचंद, कांदा, काकडी अनेक वेलवर्गीय फळे, ज्वारी, बाजरी यासारखी महत्त्वाची पिके फक्त मधमाशी आहे म्हणून आपल्या ताटापर्यंत येतात. यामध्ये साठ ते सत्तर टक्के आपले अन्न मधमाशी आपल्यासाठी तयार करीत असते, हे आपण विसरू नये. फक्त मधमाशी आहे म्हणून असे अन्न आपल्या ताटापर्यंत येतात. यामध्ये 60 ते 70 टक्के अन्न मधमाशी आपल्यासाठी तयार करीत असते हे आपण विसरू नये. याबाबतीत वनविभागाने आजपर्यंत मधमाशा आणि त्यांची पोळी वाचावी यासाठी कुठलाही प्रयत्न केलेला दिसत नाही.
वटवाघलांच्या दुनियेत वटवाघळं आपल्यासाठी मोलाच काम करीत असतात.फलाहरी वटवाघळ झाडांची बिया एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊन टाकून बीज प्रसारणाचे काम करतात. रात्रभर वृक्षारोपण करण्याचे काम वटवाघुळ करत असतात. तर दुसरीकडे कीटक भक्षी वाघळे रात्रभर कीटकांना खाऊन शेतीचे संरक्षण करीत असतात.
गांडूळांच्या दुनियेत संपूर्ण विश्वाला खत निर्मिती करण्याची ताकद आहे, त्यांच्यामुळे जंगलं हिरवीगार दिसून येतात. रानडुक्कर जंगलाची नांगरट करून जंगलाला नवचैतन्य देत असतात.
आपल्याला तरस, सिंह, हत्ती, बिबट्या, लांडगा, लांडगा, सोडले तर इतर वन्यजीव माहित नसल्यासारखे आहे. मात्र खरे वन्यजीव तर वटवाघुळ, मुंग्या, वाळवी, गांडुळे, खेकडे, घोरपडी ही आहेत. या विषयक वन विभागाला काहीच घेणंदेणं नाही, कारण यांच्यामुळे कसलेही पर्यटन चालत नाही हे विशेष. तरस, सिंह, हत्ती यावर पर्यटन चालते आणि म्हणून वनविभाग त्यांच्याकडे जास्त लक्ष देताना दिसून येतो.
कीटकांच्या विश्वातली माहिती पुरेपूर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही शिवाय सामान्य माणसाला कीटकांबद्दल कसली माहिती नाही. त्यामुळे सगळीकडे रासायनिक औषधे फवारणी करून कीटकांना मारण्याचा एक कलमी कार्यक्रम देशभर सुरू आहे. यावर कोणीही संशोधन अथवा नियंत्रण करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत नाही. मित्र कीटक आणि शत्रू कीटक यातील फरक आजपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे कोळी कीटक आपल्याला कीफायतशीर असून सुद्धा औषध फवारणीमुळे मारला जातो.
आपली चिऊताई अनेक प्रकारची कीटक खात असतेघरातील कचरा सुद्धा नियंत्रित करत असते ती सुद्धा संपण्याच्या मार्गावरती आहे. घुबड आणि पिंगळा उंदरावरती नियंत्रण करीत आहेत. कोतवाल खाटीकअसे पक्षी शेतावरती येणाऱ्या असंख्य कीटकांना खात असतात. यामुळे कीड नियंत्रणाचे महत्त्वाचे काम पार पडत असते. आपल्या परिसरातील बगळे अनेक प्रकारच्या किडी खाऊन शेतातील नांगरट करताना किड नियंत्रण करीत असतात.
इथं खेकडे, घोरपडी सुद्धा जल व्यवस्थापनाचा काम करीत असतात. त्यांना वाचवण्याची जबाबदारी सुद्धा परिसरातील लोकांचीच आहे.
आपल्या परिसरात नवनवीन अधिवास तयार होत आहेत त्यामुळे नवनवीन वन्यजीव सुद्धा पहावयास मिळतील, यात नवल नको. अगदी उस क्षेत्र वाढले तर बिबट्या, कोल्हा, लांडगा, तरस, सालिंदर, अनेक गोगलगायी, पक्षी असे वन्यजीवन आपल्याकडे दिसतील, यात वन विभागाला अजिबात दोष देऊ नये. यात त्यांची काहीच चुक नसते. आपल्या अवतीभवती जगणारे सगळया प्रकारचे वन्यजीव वाचले पाहिजेत म्हणून प्रत्येकाने याबद्दलची माहिती जाणून घेणे अत्यावश्यक बाब आहे.
नेमकं हेच काम करण्याच्या उद्देशाने वन्यजीव सप्ताह आयोजित करण्यात येतात. मात्र वाघ, सिंह, हत्ती पलीकडे अजूनही वन्यजीव सप्ताह पोचलेला नाही… सर्वात महत्वाचे म्हणजे आपापल्या परिसरातील स्थानिक झाडे वाचली पाहिजेत, शिवाय स्थानिक काटेरी झाड, झुडपे, गवत, वेली वाचवीने आवश्यक आहे, तरच वन्यजीवन टिकून राहील…
डॉ महेश गायकवाड, पर्यावरण अभ्यासक.













