तब्बल 6 कोटी ५० लाख रु किमतीची साडेसहा किलोग्रॅम व्हेल माश्याची उलटी, वजनकाटा व एक वाहन महाबळेश्वर मध्ये जप्त : वनविभागाची कारवाई
महाबळेश्वर प्रतिनिधी : दि 26
महाबळेश्वर वनविभागाने सोमवारी सायंकाळी धाडसी कारवाई करत मेढा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वर वनपरिक्षेत्रातील माचुतर येथे व्हेलमाश्याच्या उलटीची विक्री करताना अनिल अर्जुन ओंबळे, रा बोंडारवाडी, ता महाबळेश्वर वय ४३, संतोष खुशालचंद्र जैन, रा निसर्ग विहार, रत्नागीरी वय – ५३, प्रकाश पाटील वय ६३ महाबळेश्वर, संजय जयराम सुर्वे, रा नृसिंह मंदिराजवळ, मेढा ता जावली वय ५५ यांना वनविभागाने सोमवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
तब्बल साडेसहा किलोग्रॅम व्हेल माश्याची उलटी, वजनकाटा व एक वाहन जप्त करण्यात आले असून या व्हेल माश्याच्या उलटीची किंमत 6 कोटी ५० लाख असल्याची शक्यता आहे.
या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ माजली आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की, वनविभागास दिल्ली येथून खबऱ्या मार्फत दोन तीन दिवस आधीच व्हेल माशाच्या उलटीची विक्रीसाठी लोक येणार असल्याची माहिती मिळाली यासंदर्भात वनविभागाने आपल्या स्थानिक खबऱ्यांना सतर्क केले होते सोमवारी सकाळी एस टी बस ने रत्नागिरी येथून एक व्यक्ती व्हेल माश्याची उलटी घेऊन महाबळेश्वर येथे येणार असल्याची माहिती मिळाली या व्यक्तीने स्थानिकास संपर्क साधला एका चौघे जण हे महाबळेश्वर – मेढा रस्त्यावरून निघाले असताना आधीच वन विभागाने सापळा रचून माचुतर गावाच्या हद्दीमध्ये सोमवारी सायंकाळी दुपारी ५.३० वाजण्याच्या सुमारास या चौघांना ताब्यात घेतले
त्यांच्याकडे फ्लोटिंग गोल्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हेलमाशाच्या उलटी जप्त करण्यात आली तसेच वापरण्यात आलेले एक वाहन व वजनकाटा देखील ताब्यात घेण्यात आला आहे.
सोमवारी रात्री उशिरापर्यंत वनविभागाच्या कार्यालयात जबाब नोंदविण्याचे काम सुरु होते या चौघांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगळवारी ताब्यात घेतलेल्या या चौघांना वाई येथिल न्यायालयात हजर करण्यात आले या कारवाईमध्ये महाबळेश्वर सातारा व मेढा वनविभागाने सहभाग घेतला उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज सहा वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने पदभार स्वीकारलेले वनक्षेत्रपाल गणेश उत्तमराव महांगडे यांच्यासह वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी महत्वाची भूमीका बजावली आहे.
व्हेल माशाची उलटी एवढी महाग का आहे? एका किलोग्रॅम व्हेल माशाच्या उलटीची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते व्हेल माशाच्या उलटी ला शास्त्रीय भाषेत एम्बरग्रीस म्हणतात ॲम्बरग्रीसला समुद्राचा खजिना असेही म्हटले जाते व्हेलच्या आतड्यांमध्ये एम्बरग्रीस बाहेर पडतं व्हेल मासा समुद्रात अनेक प्रकारचं अन्न खात काहीवेळा त्याला एखाद्या प्रकारचे अन्न पचत नाही, तेव्हा तो उलटी करतो त्यालाच एम्बरग्रीस म्हटलं जातं. समुद्राच्या खाऱ्या पाण्यामुळे आणि सूर्यकिरणांमुळे व्हेल उलटी चिकट बनते. ती मेणासारखा दिसते तिचं वजन १५ ग्रॅमपासून १०० किलोपर्यंत असू शकतं. व्हेलच्या आतड्यातून बाहेर पडणाऱ्या उलटीला दुर्गंधी येते. मात्र या उलटीचा वापर परफ्यूम तयार करण्यासाठी काही औषधांमध्ये वापर केला जातो परफ्युम तयार करणाऱ्या कंपन्या व्हेलच्या उलटीसाठी प्रचंड रक्कम मोजतात त्यामुळेच व्हेलच्या उलटीला बाजारात कोटींचा भाव मिळतो. दरम्यान, भारतात, ॲम्बरग्रीस विक्री कायद्याद्वारे प्रतिबंधित आहे.
मागील आठवड्यामध्ये वाघाचे कातडे व नखे यांच्या तस्करी प्रकरणी महाबळेश्वर तालुक्यातील तिघांना बोरिवली पोलिसांनी अटक केली होती तर सोमवारी वनविभागाने व्हेल माश्याच्या विक्री प्रकरणी चौघांना महाबळेश्वर मध्ये ताब्यात घेतले.
विविध प्रकारच्या तस्करीसाठी महाबळेश्वर पर्यटनस्थळ तस्करांचा अड्डा म्हणून उदयास येत आहे का ? असा सवाल उपस्थित होत असून अश्या प्रकारांमुळे निसर्गसौंदर्याची व जगभरातील पर्यटकांचे माहेघर असलेले महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण बदनाम होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.













