सौ. सरिता सराटे यांच्या घरातील हरतालिका पूजन देखाव्यास प्रतिसाद
सातारा / प्रतिनिधी :
येथील लोणार गल्ली रविवार पेठेतील राहीवासी सौ. सरिता सचिन सराटे यांनी त्यांच्या घरातील गौरी गणपतीसमोर ‘हरतालिका पूजन’ हा सजावटपर देखावा केला आहे. तो पाहण्यासाठी आबालवृद्धांची त्यांच्या निवासस्थानी गर्दी होत असून कलात्मकरीत्या केलेल्या या सजावटीचे कौतुक करत आहेत.
सौ. सरिता सराटे या दरवर्षी आपल्या घरातील गौरी- गणपतीसमोर कल्पकतेने वेगवेगळे ऐतिहासिक, पौराणिक कथा विषय मूर्ती, पोस्टर आदी स्वरूपात सजावटीतून साकारत असतात. यावर्षी त्यांनी हरतालिका पूजन हा धार्मिक विषय घेऊन देखावा सादर केला आहे. हिमालय पर्वतावर भाविक महिला व पार्वती देवी शिवलिंगाची पूजा करत आहेत. अशा आशयाची ही मूर्ती रूपातील सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे सौ. सराटे यांनी साकारलेला देखावा चित्ताकर्षक ठरला आहे.
सराटे कुटुंबीयांनी स्वतः परिश्रम घेऊन ही सजावट केली असून या परिवाराच्या कल्पकतेचे दर्शकांकडून कौतुक होत आहे. महिला मंडळींसह परिसरातील नागरिकांकडून होत असलेल्या कौतुकाबद्दल सौ.सरिता सराटे यांनी आभार व्यक्त केले आहेत. तसेच यापुढेही दरवर्षी वेगवेगळ्या सजावटी सादर करण्याचा मनोदयही त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.













