संत ज्ञानेश्वर महाराज मूर्तीची देगावमध्ये रविवारी स्थापना
![]()
‘ज्ञानोबा माऊलीं’ च्या गजराने दुमदुमली देगाव नगरी
भुईंज / प्रतिनिधी :
देगाव, (ता. वाई) येथील श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची स्थापना रविवार, दि. 24 रोजी करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाचे औचित्य साधून पंचक्रोशीत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने पाचगणी, ता. महाबळेश्वर येथील ह. भ. प. आत्माराम महाराज आम्राळे यांच्या सौजन्याने मूर्ती भेट देण्यात आली आहे. मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या निमित्ताने देगाव पंचक्रोशीतील वातावरणामध्ये चैतन्य निर्माण झाले असून सर्व ग्रामस्थ बंधू-भगिनी व मुंबईकर मित्रमंडळींच्या सहभागातून कार्यक्रम यशस्वी केले जात आहेत. मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवारी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळाच्या सहभागातून टाळ- मृदंगाच्या जयघोषात व हातात भगव्या पताका घेऊन महिला, मुली, माहेरवासीनी व आबालवृद्धांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे.
प्रत्येक ग्रामस्थांच्या दारासमोर काढण्यात आलेल्या रांगोळ्यांमुळे वातावरण प्रसन्न झाले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दिंडी मिरवणुकीचा समारोप होत असून मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला हा.भ. प. ज्योतीताई मतकर, भुईंज पो. स्टे. चे सपोनी रमेश गर्जे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सर्वसामान्य जनतेला अध्यात्माची गोडी निर्माण व्हावी व भगवत गीतेचा अर्थ साध्या सोप्या मातृभाषेत समजावा म्हणून बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका ज्ञानेश्वरीची रचना केली. ज्ञानदेवादी भावंडे व तत्कालीन संतांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सर्वधर्म समानतेची शिकवण देत कर्मातूनच भगवंताच्या भक्तीचा संदेश दिला. ‘राम कृष्ण हरी’ हा सहजसोपा मंत्रही दिला.
पारायण सोहळे, पसायदान, हरिपाठ, भजन- कीर्तन आदींच्या रूपाने गावोगावी भक्तीचा वसा व वारसा जपण्याचा प्रयत्न होत असतो. त्यादृष्टीने देगावमध्ये संपन्न होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्ती स्थापनेला विशेष महत्त्व व आध्यात्मिक परंपराही आहे. श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरामध्ये दिंडी मिरवणुकीचा शनिवारी सायंकाळी समारोप होत असून रविवारी दिवसभर मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने होत असलेल्या विविध कार्यक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन ग्रामस्थ मंडळ देगाव यांनी केले आहे.













