Tue, Mar 3, 2026
शिक्षण सातारा जिल्हा

अशैक्षणिक कामे व दप्तर दिरंगाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा – बलवंत पाटील

अशैक्षणिक कामे व दप्तर दिरंगाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा – बलवंत  पाटील
Ashok Ithape
  • PublishedSeptember 16, 2023

सातारा I प्रतिनिधी: दि.१६ सप्टेंबर

शिक्षकांवरील अन्याया विरोधात 2 ऑक्टोबर रोजी भव्य आक्रोश मोर्चा – शिक्षक नेते बलवंत पाटील

देशाची भावी पिढी घडवण्याचे पवित्र काम शिक्षक करीत असतात. प्राथमिक शिक्षकांची जबाबदारी त्याहून अधिक आहे, कारण या काळात विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया घडवला जातो, त्यासाठी प्राथमिक शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या कामाला महत्व दिले पाहिजे. त्यांना प्रेरणा देण्याची भूमिका शासनाने ठेवली पाहिजे, ही आमची केवळ मागणी नसून शासनाचे कर्तव्य आहे. परंतु ज्ञानदानाची प्रेरणा देण्याऐवजी वारंवार अशैक्षणिक कामे शिक्षकांवर लादली जात आहेत. कामे वाढवताना आमच्या प्रलंबित प्रश्नांनकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे शिक्षक वर्गात संतापाची भावना आहे.

आता आम्हाला आमच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नाही. याचाच एक भाग म्हणून २ ऑक्टोबर २०२३ रोजी शिक्षकांच्या रास्त मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा शिक्षक संघाचे नेते बलवंत पाटील यांनी येथे बोलताना दिला.

बलवंत पाटील पुढे म्हणाले, शासनाला व समाजाला शिक्षकांकडून भरपूर अपेक्षा असतात, त्याची पूर्तता करण्यासाठी शिक्षक सतत झटत असतात. त्यासाठी त्यांना अधिकाधिक स्वातंत्र्य देण्याऐवजी त्यांच्याकडून अशैक्षणिक कामे करून घेण्यावर भर दिला जात आहे, ही बाब चुकीची आहे. त्यामुळे शिक्षकांचे नुकसान होत आहे त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत आहे, याचा कसलाही साधकबाधक विचार होताना दिसत नाही.

दररोज ठराविक वेळेत वेगवेगळी माहिती ऑनलाईन भरणे, बीएलओचे कामकाज, नवभारत निरक्षरांचे सर्वेक्षण अशा वेगवेगळ्या अशैक्षणिक कामाचा भडीमार होत असल्याने अध्यापनाचा महत्त्वपूर्ण वेळ वाया जात आहे.

या अशैक्षणिक कामातून नेमके काय साध्य होत आहे व त्याचा अध्यापनाच्या कामावर कसा वाईट प्रभाव पडत आहे, याचे आकलन शासनाने अभ्यास समिती नेमूनकरून घेणे जरुरीचे आहे. म्हणजे मग आमची मागणी किती रास्त आहे, हे त्यांच्या लक्षात येईल. वास्तविक अशैक्षणिक कामांसाठी शासनाने वेगळी यंत्रणा कामाला लावायला हवी.

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मागणी करूनही त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ही अशैक्षणिक कामे बंद झाल्याशिवाय शिक्षक शांत बसणार नाहीत. बलवंत पाटील पुढे म्हणाले, अवांतर अशैक्षणिक कामांचे ओझे शिक्षकांवर लादताना शासन त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे मात्र हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे.

गेली अनेक वर्ष सातारा जिल्ह्यातील पदोन्नती, वरिष्ठ श्रेणी प्रस्ताव, निवड श्रेणी प्रस्ताव या बाबी प्रलंबित असून वरिष्ठ पातळीवरून शिक्षकांच्या या प्रश्नांसंदर्भात हेळसांड होत आहे.

शिक्षक संघटनांनी वारंवार ही बाब शासनाच्या निदर्शनास आणली, मात्र संघटनांनी लेटर पॅडवर दिलेल्या निवेदनांना कचरापेटी दाखवली गेली, हे कितपत योग्य आहे? दीड वर्षांपूर्वी कराड येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी याच मागणीसाठी एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले होते.. त्यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी चर्चेअंती दहा दिवसात हा प्रश्न निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. या घटनेला आता दीड वर्ष होऊनही शिक्षकांना न्याय मिळत नसल्याने सर्वांच्या मनात संतापाची भावना आहे.

शासनाने आश्वासनपूर्ती न केल्यास दि. २ ऑक्टोबर २०२३ रोजी शिक्षक संघातर्फे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा बलवंत पाटील यांनी दिला.

विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख पदवीधर पदोन्नती, उपशिक्षक, पदवीधर मुख्याध्यापक, वरिष्ठ श्रेणीप्रस्ताव मंजुरी व नवीन प्रस्ताव मागणी, निवड श्रेणीबाबतच्या मागण्या मंजूर होत नाहीत, तोपर्यंत टप्प्याटप्प्याने आंदोलन अधिकाधिक तीव्र केले जाईल, असे ते म्हणाले.

शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले, अवांतर अशैक्षणिक कामे व श्रेणी प्रस्ताव मागण्यांबाबत आम्ही गंभीर आहोत. आमच्या भावनांची दखल शासनाला घ्यावीच लागेल. २ ऑक्टोबर पर्यंत याबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. आमच्या मागण्यांबाबत शासन गंभीर नसल्याचा गेले दीड वर्षापासूनचा आमचा अनुभव असून यावेळी काही झाले तरी आम्ही मागे हटणार नसल्याचे संघाचे जिल्हा सरचिटणीस सुभाष ढालपे म्हणाले.

सातारा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी शिक्षकांच्या आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील हजारो शिक्षक सहभागी होतील व शासनाला जाग आणतील, असा इशारा दिला.

सातारा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी शिक्षकांच्या आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील हजारो शिक्षक  व महिला भगिनी  सहभागी होतील व शासनाला जाग आणतील, असा यावेळी इशारा दिला.

या मिटिंगमध्ये नारायण संकपाळ नवनाथ भरगुडे, विक्रम डोंगरे,दिपक गिरी, विजय खांडके सर, दत्ता पाटील,बी.एस .कणसे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार, मनोहर माने, जयकर खाडे, भालचंद्र थोरात,पी.जी भरगुडे, संचालक शहाजी खाडे,ज्ञानबा ढापरे, शशीकांत कांबळे, राजेंद्र दगडे,सुरज तुपे, सुरेंद्र भिलारे, संभाजी कदम, राजेंद्र मुळीक . भानुदास राऊत, हणमंत रसाळ व बहुसंख्य शिक्षक संघाचे सभासद उपस्थित होते

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!