Thu, Jan 15, 2026
सातारा जिल्हा सामाजिक

वाईवरून साताऱ्याकडे निघालेला मराठा मोर्चा महामार्गावर थांबवला, शासनाला निवेदन देऊन मोर्चा स्थगित

वाईवरून साताऱ्याकडे निघालेला मराठा मोर्चा महामार्गावर थांबवला, शासनाला निवेदन देऊन मोर्चा स्थगित
Ashok Ithape
  • PublishedSeptember 5, 2023

मराठा आरक्षणप्रश्नी जालना जिल्ह्यातील आंदोलनावेळी मराठा समाजबांधवांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वाई तालुक्यातील मराठा क्रांती आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी वाईहून साताऱ्याच्या दिशेने काढलेला मोर्चा पोलीस प्रशासनाने पाचवड येथे थांबवला प्रशासनाने आंदोलकांचे निवेदन स्वीकारून मोर्चा थांबवण्याचे आवाहन केले. त्यानुसार मोर्चा स्थगित करण्यात आला. दरम्यान वाई शहर व तालुक्यात मंगळवारी कडकडीत बंद पाळून जालन्यातील घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला वाईतील व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद यशस्वी केला. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

वाई / प्रतिनिधी

जालना येथे मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आज मंगळवारी सकाळी वाईहुन साताऱ्याकडे शेकडो कार्यकर्त्यांचा पायी निघालेला मोर्चा पुणे बंगळूर महामार्गावर पाचवड येथे प्रशासनाकडून थांबवण्यात आला. यामुळे मोर्चेकरी कार्यकर्ते आक्रमक झाले होते.तेथे शासनाला निवेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चा संघटनेचा वाई ते सातारा पायी मोर्चा काढण्यात आला होता. रायरेश्वर वरून आलेल्या क्रांती ज्योतीचे स्वागत करून श्री महागणपती व श्री छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्री महागणपतीची आरती करून गणपती घाटावरून सातारा कडे मोर्चास प्रारंभ झाला.

वाई ते सातारा पायी मोर्चेचा मार्ग गणपती घाट बावधन ओढा कडेगाव पाचवड उडतारे लिंबफाटा वाढे सदरबाजार जिल्हाधिकार्यालय असा आहे. या मार्गावरील सर्व गावातील मराठा बांधवानी सहभागी होऊन लाखोंच्या संख्यानी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले होते.

या मोर्चासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक कृष्णकांत पवार,सुधीर वाळुंज,बिपीन चव्हाण आदी अनेक अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. या मोर्चात सर्व समाजाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मराठा समाजाचा वाई ते सातारा निघालेला मोर्चा पोलिसांनी पुणे बंगळूर महामार्गावर पाचवड येथे अडवला, यामुळे मोर्चेकरी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी आक्रमक झाले होते.
मात्र पाचवड ( ता वाई) येथे अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी समन्वयकांशी चर्चा केली. तेथे शासनाला युवक युवतींच्या हस्ते निवेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला. यावेळी अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेला बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आलेला होता.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!