काळ्या फिती लावून शिक्षक दिनी अध्यापन : बलवंत पाटील
![]()
अशैक्षणिक कामांच्या भडिमाराच्या निषेधार्थ प्राथमिक शिक्षकांचे आज अनोखे आंदोलन
खंडाळा / प्रतिनिधी : दी. ४ सप्टेंबर २०२३
शासनाने लादलेल्या अशैक्षणिक कामाचा निषेध म्हणून 5 सप्टेंबर या शिक्षक दिनी सर्व प्राथमिक शिक्षक काळ्या फिती लावून अध्यापन करणार आहेत. या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक नेते व प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन बलवंत पाटील यांनी केले आहे.
खंडाळा येथे झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या सहविचार सभेत ते बोलत होते. प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सरचिटणीस सुभाष ढालपे, ज्येष्ठ नेते बबन ठोंबरे, बँकेचे संचालक विजय ढमाळ, सौ. निशा मुळीक, तालुकाध्यक्ष पांडुरंग भरगुडे, भानुदास राऊत, दत्तात्रय महांगरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना नवसाक्षर अभियानाच्या सर्वेक्षणासह अशैक्षणिक व ऑनलाईन कामांना विरोध करत आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या, आमचे आद्यकर्तव्य आम्हाला बजावू द्या, हे शासनाला ठणकावून सांगण्यासाठी शिक्षकदिनासारख्या पवित्र दिवशी काळ्या फिती लावून आंदोलन करण्याची वेळ प्राथमिक शिक्षकांवर आली आहे. यातून शासनाने बोध घ्यावा व अशैक्षणिक कामांचा बोजा दूर करावा, या मागणीसाठी हे आंदोलन करत आहोत असेही यावेळी बलवंत पाटील यांनी सांगितले.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, “शिक्षकांच्या दृष्टीने शिक्षक दिन अत्यंत महत्त्वाचा व पतितपावन दिवस असतो. मात्र अशैक्षणिक कामांच्या भडीमाराने वैतागलेल्या गुरुजन कार्यकर्त्यांसमोर काळ्याफिती लावून अध्यापन करण्याशिवाय पर्याय नाही, हे दाखवून देण्यासाठीच आम्ही गांधीगिरी पद्धतीने हे आंदोलन करत आहोत. निवडणूक, जनगणना व आपत्ती व्यवस्थापनाच्या शासकीय कर्तव्यपालनात शिक्षक जबाबदारीने काम करतात. मात्र दिवसेंदिवस शिक्षकांना अतिरिक्त कामांच्या जंजाळात अडकवले जात असल्याने त्यांना शिकवण्याच्या मूळ कर्तव्यपालनास वेळच मिळत नाही, अशी स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे हे आंदोलन करण्यावर आम्ही ठाम आहोत. ठिकठिकाणचे शिक्षक या आंदोलनात सहभागी होतील व काळ्याफिती लावून अध्यापन करतील.”
शिक्षक बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे म्हणाले की, अशैक्षणिक कामाने दबलेल्या शिक्षकांना खुल्या वातावरणात शैक्षणिक कर्तव्य बजावता आले पाहिजे. तसेच पदवीधर वेतनश्रेणीतील त्रुटी, पदवीधर, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख बढती, वैद्यकीय बिले, फंडाच्या स्लिप वेळेत मिळाव्यात या मागण्यांबाबतही शिक्षक आता आक्रमक होत आहेत. त्याची सुरुवात शिक्षक दिनाच्या आंदोलनापासून होत आहे.
यावेळी चंद्रकांत यादव, सुभाष ढालपे, बबन ठोंबरे, संचालक विजय ढमाळ, सौ. निशा मुळीक आदींनी त्यांच्या भाषणात आंदोलनाची दिशा स्पष्ट केली व काळ्या फिती लावून शैक्षणिक सेवा बजावण्याच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
या सहविचार सभेस रोहिदास कापसे, नारायण सपकाळ, संभाजी कदम, रत्नकांत भोसले, गंगाराम पवार, बाळासाहेब ढमाळ आदींसह परिसरातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













