![]()
फुकटचेच सल्ले या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मोठ्या थाटामाटात नुकताच साहित्य परिषद पुणे इथे महामेट्रोचे आयुक्त श्रवण हर्डीकर, नामवंत समीक्षक रणधीर शिंदे, आणि साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सभागृहातला प्रत्येक रसिक संपूर्ण दोन तास विनोदाच्या लाटांवर स्वार होऊन अतीव आनंद घेत होता!
‘फुकटचेच सल्ले’
डॉ. रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी या नुकत्याच निवृत्त झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याचं ‘फुकटचेच सल्ले’ हे पुस्तक वाचलं. सर्वसाधारणत: शासकीय अधिकाऱ्यांच्या ह्दयातून नामशेष झालेला विनोद (शेखर गायकवाड, मितेश घट्टे, असे काही अधिकारी मात्र याला अपवाद आहेत!) रवींद्र तांबोळी नामक अधिकाऱ्याच्या लिखाणातून जाणवला आणि धन्य वाटलं. पुस्तक पुढे वाचण्याची इच्छा मनात निर्माण झाली.
फुकटचेच सल्ले हे पुस्तक खरं तर रवींद्र तांबोळी यांचं संक्षिप्त रूपातलं आत्मचरित्र किंवा आत्मकथनच म्हणावं लागेल. मात्र इतर वाचलेल्या आत्मकथनांपेक्षा हे जरा वेगळं आहे. (अपवाद – अत्रेंचं कऱ्हेचे पाणी, मी कसा झालो, अहिंसा आणि मी, झेंडूची फुले इ.) अंगाअंगात फक्त विनोदच भरलेला असल्यामुळे तांबोळी यांचं हे पुस्तक खुमासदार झालं आहे. कऱ्हेचे पाणी वरून तऱ्हेतऱ्हेचे पाणी असा संदर्भ देत मी कसाबसा काहीही झालो या शीर्षकाचा लेख भन्नाट आहे. स्वर्गात गेल्यावर नारदमुनी, चित्रगुप्त, अप्सरा आणि वेल्कम ड्रिंक मिळणं हे सगळं वाचताना लेखकाचं कल्पनारंजन किती अफलातून आहे हे लक्षात येतं.
या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे लेखक स्वत:वरच विनोद करतो, अगदी बालपणापासून म्हणजे जन्माच्या कहाणीपासून ते निवृत्तीपर्यंतचा कालावधी तो सुरस कथा रंगवत सांगतो. जन्मकथेला पौराणिक संदर्भ देत तो आपला प्रवास वाचकांना घडवतो. या प्रवासात जन्मदात्री आई, शेजारणीपाजारणी, शाळेतले गुरूजी, वर्गमित्र, अशी अनेक पात्रं येतात. आणखी एक विशेष म्हणजे स्वत:च्या प्रवासाबरोबरच लेखकाने तो काळ, ती परिस्थिती, तंत्रज्ञानात झालेले बदल आणि माणसाच्या आयुष्यात वेळोवेळी केलेला शिरकाव हे खूपच सहजपणे पेरलं आहे.
प्रत्येकाच्या जगण्यात चढउतार, संकटं, सुखदु:खं येतात, कोणी नाउमेद होतो, तर कोणी नैराश्याच्या खाईत जातो, तर कधी कोणी रूक्ष, कोरडा बनतो. मात्र फुकटचेच सल्ले देणारा तांबोळी नामक व्यक्ती जगणं किती सुंदर आहे आणि ते त्याचा आस्वाद घेत कसं जगावं याचा प्रत्यंतर देते. दु:खाला आपल्या जगण्यातून हद्दपार करते, तर संकटांना सहजपणे पळवून लावते. आपल्या जगण्याच्या कुठल्याही टप्प्यावर त्यांना विसावू देत नाही.
पुस्तकाची भाषा मात्र शासकीय अधिकारी ज्या पद्घतीने औपचारिक शैलीत अहवालवजा करतील त्याप्रमाणे केली असूनही वाक्यावाक्यात विनोदाची पेरणी लेखकाने केलीय. हे विनोद बोचरे नाहीत, तर गाली सुखद हासू आणणारे आहेत.
या विनोदातून व्यक्तीवरचं व्यंग, दुय्यमत्व, शरीरपातळीवरची चेष्टा यांचा समावेश नसल्यामुळे केवळ निखळ, नितळ असा अनुभव वाचकाला मिळतो. विनोदी शैलीने आजच्या वर्तमानातलं व्यंगही लेखकाने अगदी सहजपणे टीपलं आहे हे विशेष! म्हणजे सुरुवातीलाच सध्या समाजमाध्यमांचा उच्छादाचा काळ हे नमूद केलं आहे आणि माहितीलाच ज्ञान समजण्याचा हा कालखंड कसा आहे हे सांगितलं आहे. खरं तर या पुस्तकाची अनुक्रमणिका वाचूनच वाचकाला पुस्तक वाचण्याची उत्सुकता जागी होते. आमची अविरत प्रेमप्रकरणे, आत्मस्तुतीचे प्रयोग, हाकलून दिले मज कितिक वेळा, चला, होऊ भ्रष्टाचारी, मास्कधारिणी, चित्तहारिणी अशी शीर्षकं बघून वाचकांची उत्कंठा वाढीला लागते हे नक्की!
चित्रपटातले नायक-नायिका हे प्रेमशास्त्र शिकवायला चित्रपटांच्या पडद्यावरून कसे गावोगाव फिरत असत किंवा प्रेमात आडवे येणारे गुंड म्हणजे वर्गशिक्षक कसे असत, प्रेम करायचं असेल तर ते पोटभर खाऊनपिऊन करावं वगैरे गोष्टी वाचताना मजा येते. मुख्य म्हणजे ‘सत्यम शिवम सुंदरम’ हा चित्रपट बघून एखादी युवती आपला अर्धवट चेहरा दाखवत असेल तर तिच्या चेहऱ्यात काहीतरी दोष असतोच, किंवा ‘बॉबी’सारखा चित्रपट बघून प्रेयसीला घेऊन पळून गेलो तर मृत्यूयोग येऊ शकतो, ‘लैला मजून’ बघून आपापल्या दर्जाप्रमाणे प्रेम केलं नाही तर लोकांचे दगड खावे लागतात, प्रेमभावना जागी होणं म्हणजे आपल्याला मूर्ख बनवलं जाणं, याचा लेखकाला झालेला साक्षात्कार अवाक् करणारा आहे.
पूर्वीच्या काळी नावलौकिक कमावण्यासाठी कर्तृत्ववान व्हावं लागत असे. शिक्षक, प्राध्यापक अशा पदांवरची माणसं समाजात आदर्श असत. आता मात्र आत्मस्तुती कीर्तीसाठी किती आवश्यक आहे आणि काही विशिष्ट व्यवसायातली धनदांडगी मंडळी आज समाजाचा आदर्श आहे हे परखड वास्तव देखील लेखकाने आपल्या खास हलक्या फुलक्या शैलीत सांगितलं आहे.
स्थलांतरितांचं गावं म्हणजे पुणे शहर, मंदी नसतानाही बेरोजगार असणं, फेसबुक म्हणजे मुखग्रंथ आणि त्याची निर्मिती का झाली असावी हे सांगताना – भारतीय मानस हे गावगप्पाला, बाजारगप्पाला चटावलेलं आहे हे अमेरिकेत बसून मार्क झुकरबर्गने कसं ओळखलं हे सांगणं, नव्याने काही वाक्प्रचार रूढ करताना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे असंख्य फेसबुक फॉलोअर असतात हे सांगणं, त्यातही मराठवाड्यातल्या निजामशाहीचा प्रभाव असलेल्या मंडळींसाठीच्या ओळी वाचकांना भावणाऱ्या आहेत :
कुछ भी कर, लेकिन काम मत कर
काम की सिर्फ फिक्र कर
फिक्र का लेकिन जिक्र कर
जिक्र करके आराम कर
लेखकाने बालपणीच्या आठवणी सांगताना रफ वही/फेअर वही, काहीच भाग्यवंतांना लाभणारी ती अल्युमिनियमची पेटी अशा काही प्रसंगांनी वाचकांच्या मनातही आपापलं बालपण जागं होतं. ऐंशी-नव्वदीच्या दशकात रेकॉर्डप्लेअरची प्रतिष्ठा, मराठवाड्यातलं पाण्याचं दुर्भिक्ष्य, पुरुषांचं वाढलेलं पोट, निवृत्तीनंतर काय करावं, सकाळी उठून फिरायला जाताना शेजाऱ्यांच्या झाडांची फुलं कशी तोडावीत पासून चहा-नाश्त्याची व्यवस्था परिचितांकडे कशी करून घ्यावी हे वाचणं रंजक आहे.
फुकटेचच सल्ले या पुस्तकाचं अतिशय सुरेख असं कथानकाला जिवंत करणारं मुखपृष्ठ आणि आतली रेखाचित्रं गिरीश सहस्त्रबुद्घे यांनी केली आहेत. त्यामुळे पुस्तकाचं रूपडं जास्त खुललं आहे. थोडक्यात, मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं डॉ. रवींद्र तांबोळी यांचं फुकटचेच सल्ले हे विकत घेऊन वाचायला काहीच हरकत नाही हे मात्र खरं!
दीपा देशमुख, पुणे.













