Thu, Jan 15, 2026
महाराष्ट्र योजना

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ग्रामीण कारागिरांसाठी फलदायी – आर. विमला

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ग्रामीण कारागिरांसाठी फलदायी – आर. विमला
Ashok Ithape
  • PublishedAugust 31, 2023

सातारा दि.31: केंद्र सरकारने नुकतीच सुरू केलेली प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना पारंपारिक ग्रामीण कारागरांसाठी सहाय्यभूत ठरणारी योजना असून या योजनेमुळे राज्यातील ग्रामीण कारागिरांना प्रोत्साहन मिळणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी दिली.

आर. विमला यांनी मधाचे गाव मांघर येथे भेट देवून ग्रामस्थ, मधपाळ बी ब्रीडर्स, शेतकरी महिला यांच्याशी सुसंवाद साधला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की राज्यातील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सुमारे सात लाख ग्रामीण कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, पाथरवट, नाभिक, धोबी, खेळणी बनवणारे, झाडू तयार करणारे, सोनार, मिस्त्री, शिल्पकार इत्यादी उद्योगांच्या कारागिरांचा यामध्ये समावेश आहे.

केंद्राच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध होणार आहे व या योजनेअंतर्गत उद्योगाच्या कौशल्य वृद्धीसाठी प्रशिक्षण व विद्या वेतन मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असून सदर योजना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या कारागिरांना नवे ओळखपत्र व योजनेत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शासनाने महाराष्ट्र राज्यात योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे.

मधाचे गाव मांघर येथे मधाचे गाव संकल्पना परिपूर्ण होण्यासाठी व या उद्योगातील शृंखला पूर्ण होण्यासाठी गावातच मध प्रक्रिया, मेण प्रक्रिया मध बॉटल फिलिंग मशीन बसवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी मधमाशांना उपयुक्त वनस्पतीचे वृक्षारोपण करण्यात आले, मधपालकाना मध उद्योगाचे प्रशिक्षण प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. गटविकास अधिकारी पंचायत समिती महाबळेश्वर अरुण मरभळ यांनी स्वागत केले, गणेश जाधव अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांनी प्रास्ताविक केले. संजय जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी गणेश जाधव तसेच ग्रामसेवक पी.जी.तायडे कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक श्री किरतकुडवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मधाचे गाव मांघर व आजूबाजूच्या गावातील कारागिरांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!