“किसन वीर’ चे प्रतिटन ५० रूपयांप्रमाणे ऊस बील वर्ग – प्रमोद शिंदे
![]()
शेतकऱ्यांच्या खात्यावर २ कोटी ३० लाख रूपये जमा.
भुईंज / प्रतिनिधी दि. २६ ऑगस्ट :
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ४ लाख ६० हजार ५४६ मेट्रिक टनाचे ऊसाचे बील ११९ कोटी ७४ लाख २० हजार ६१४ रूपये यापुर्वीच प्रतिटन २ हजार ६०० रूपयांप्रमाणे जमा केलेले होते. एफआरपीप्रमाणे उर्वरित ५० रूपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे होणारी रक्कम २ कोटी ३० लाख २७ हजार ६६७ रूपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यामध्ये वर्ग केल्याची माहिती, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.
माहितीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर कारखान्याची रिकव्हरी (ऊस उतारा) ११.७०% आहे. एफआरपीप्रमाणे २६५० रूपये प्रति मेट्रिक टन इतका निघत असून त्यानुसार ऊस बीलाची संपुर्ण रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे एफआरपीप्रमाणे जो दर निघेल तो दर दिला जाईल, हा सभासदांना दिलेला शब्द आज खऱ्या अर्थाने पुर्ण झाल्याचा आनंद आमच्या व्यवस्थापनास असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले. किसन वीर कारखान्याचे ऊसाचे बील एफआरपीप्रमाणे जमा झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
किसन वीर व खंडाळा कारखान्यातील येणाऱ्या गळीत हंगाम सन २०२३ – २४ दृष्टीने सर्व अंतर्गत कामे पुर्णत्वास आलेली असून यावर्षीचा गळित हंगाम पुर्ण क्षमतेने चालविण्यासाठी ऊस तोडणी यंत्रणेचे आवश्यक करार झालेले आहेत. तसेच तोडणी यंत्रणेस पहिला हप्ता दिलेला असून, दुसरा हप्ताही लवकरच देण्यात येणार आहे. किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या सभासद व बिगर सभासदांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपला संपुर्ण ऊस दोन्ही कारखान्यास द्यावा, असे आवाहनही व्यवस्थापनाच्यावतीने प्रमोद शिंदे यांनी केले आहे.
यंदा शेतकऱ्यांची दिवाळी करणार गोड- प्रमोद शिंदे
किसन वीर कारखान्याकडे गळितास आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन ५० रूपयांप्रमाणे रक्कम वर्ग केलेली असून यातून ते शेतीच्या मशागतीची कामेही करू शकतात. तसेच आमदार मकरंदआबा पाटील व त्यांचे व्यवस्थापन शेतकऱ्यांची दिवाळीही निश्चितपणे गोड करणार असल्याची माहिती प्रमोद शिंदे यांनी यावेळी दिलेली आहे.













