सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७३ वी वार्षिक साधारण सभा खेळीमेळीचे व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
![]()
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ७३ वी वार्षिक साधारण सभा शुक्रवार दि. २५/०८/२०२३ रोजी खेळीमेळीचे व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व अहवाल सालात समाजाशी, सहकार चळवळीशी, बँकेशी बांधिलकी असणा-या, निधन पावलेल्या सभासद मान्यवर, कार्यकर्ते, बँक सेवक तसेच देशासाठी धारातिर्थी पडलेल्या शूर जवान याशिवाय ज्ञात,अज्ञात मृत बँक खातेदार,बँकेचे हितचिंतक इत्यादिंना सभेने श्रध्दांजली वाहिली
बँकेचे अध्यक्ष श्री. नितिन जाधव पाटील यांनी बँकेच्या अहवाल सालातील कामाचा, प्रगतीचा, कार्याचा आलेख सभेसमोर विषद केला. यामध्ये शेतकरी सभासद, सर्वसामान्य सभासदांच्या हिताच्या दृष्टीने राबवित असलेल्या विविध कर्ज व ठेव योजना, तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून विकासाभिमुख करीत असलेले काम, कृषि व ग्रामीण विकास योजना इ. चा उल्लेख करुन संकल्पपूर्तीची, भावी संकल्पाची माहिती दिली.
नुकतेच बँकेने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलेले आहे. एकूणच बँकेच्या सात दशकाच्या वाटचालीत बँकेचे नेतृत्व केलेल्या विलासराव पाटील (उंडाळकर), केशवराव पाटील, श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील, भि. दा. भिलारे (गुरुजी), बकाजीराव पाटील, सुरेश वीर, दादाराजे खर्डेकर, विलासराव पाटील (वाठारकर), सदाशिवराव पोळ इत्यादी मान्यवरांचे मोलाचे योगदान आहे. याबरोबरच बँकेचे जेष्ठ संचालक व विधान परिषदेचे माजी सभापती मा. आ. रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व माजी सहकार व पणन मंत्री मा. आ. बाळासाहेब पाटील, संचालक मा. खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, संचालक मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. आ. मकरंद पाटील उपाध्यक्ष मा. अनिल देसाई तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरु असलेचे सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी वार्षिक साधारण सभेच्या विषयांचे वाचन केले. विषयानुषंगाने सांगोपांग चर्चा होवून सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले .बँकेची वैशिष्ट्यपूर्ण कार्यप्रणाली, बँकेचे उत्कृष्ठ कामकाज, सक्षम व भक्कम आर्थिक स्थिती, बँकेच्या विविध व नाविन्यपूर्ण विकास योजना याबद्दल सभासदांनी बँकेच्या कामाची प्रशंसा करुन यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .
संस्था सभासदांच्या प्रतिनिधींनी बँकेच्या उल्लेखनिय कामकाजाबद्दल अभिनंदनाचे ठराव मांडले. विविध कर्ज योजना व कामकाजाचे अनुषंगाने असलेल्या अडीअडचणी संबंधी प्रश्न सभेत मांडले तसेच काही सूचना केल्या. सभासदांनी केलेल्या सूचनांबाबत विचार केला जाईल तसेच अडीअडचणी, बँकेच्या नवनवीन योजना, प्रश्न सोडवणूकीचे दृष्टीने बँकेचे मा. संचालक मंडळ प्रयत्नशील राहील व सहकार्य करेल अशी ग्वाही मा. अध्यक्ष यांनी दिली. डॉ. राजेंद्र सरकाळे यांनीही सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन केले .
महाराष्ट्राचे विधानपरिषदेचे माजी सभापती मा. आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, आपली बँक अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. सातारा जिल्हा बँक देशात सहकार क्षेत्रात अग्रगण्य आहे. या बँकेला स्थापनेपासून चांगले नेतृत्व लाभले आहे. अस्मानी संकट, आर्थिक अडचण व सावकारी पाश या मधून शेतकरी बाहेर यावा, त्यांचा विकास व्हावा म्हणून स्व .यशवंतराव चव्हाण यांनी दूरदृष्टी ठेवून बँकेची स्थापना केली. शेतक-यांनी घेतलेल्या कर्जातून त्यांच्या कुटुंबाचा विकास झाला पाहिजे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास झाला पाहिजे.
बँकेला चांगली परंपरा आहे. बँकेत कोणत्याही प्रकारचे राजकारण आणले जात नाही म्हणून बँकेचा नावलौकिक व प्रगती झाली आहे. कर्जदार सभासदांनी घेतलेले कर्ज वेळेत परत केले पाहिजे, प्रत्येक वेळी शासन कर्ज माफ करील असे नाही. शेतक-यांच्या मुलांची प्रगती झाली पाहिजे, त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले पाहिजे. शेतक-यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घावे याकरिता बँक विद्यार्थ्यांना शिक्षणसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज देते. बँकेने काळानुरुप कामकाज पध्दतीत सुधारणा करुन ग्राहकांना आधुनिक बँकेच्या खाजगी व राष्ट्रीयकृत बँकांसारख्या सेवा सुविधा देत आहे. जागतिक पातळीवर नावलौकिक असलेल्या इन्फोसिस या नामवंत कंपनींचे फिनॅकल सॉफ्टवेअर बँकेने घेतले असून लवकरच ग्राहकांना जलद व तत्पर सेवा मिळणार आहेत. भविष्याचा विचार करुन बँकिंग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) चा वापर केला पाहिजे. जागतिक तापमानवाढीचे संकट संपूर्ण जगाला भेडसावत आहे. शेतक-यांनी चांगला शेती व्यवसाय करावा बँकेचा अधिक विकास व्हावा व आधुनिकतेचा जास्तीत जास्त वापर करावा. अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्व शेतकरी सभासद, ग्राहक, कर्जदार व ठेवीदारांना शुभेच्छा दिल्या.
मा .खा .श्रीमंत छ .उदयनराजे भोसले म्हणाले, बँकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी झाली. बँकेचे कामकाज आदर्शवत असून सहकार क्षेत्रातील इतर संस्थाना मार्गदर्शक आहे. सहकार चळवळीचा मुख्य उद्देश म्हणजे सामान्य माणसांची प्रगती, सावकारीतून मुक्तात झाली पाहिजे. व्यवसायातून अधिक उत्पन्न मिळाले पाहिजे. शेतक-यांची आर्थिक प्रगती झाली पाहिजे. बँक आर्थिकदृष्टया सक्षम असून तरुण पिढीला शिक्षणासाठी कर्जपुरवठा करीत आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेवून मोठ मोठया पदांवर काम करावे. तरुण पिढीने व्यवसायीक व तांत्रिक शिक्षण घेतले पाहिजे.
आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण झाले पाहिजेत. बँकेला पहिल्यापासूनच चांगला इतिहास आहे, राजकारण केले जात नाही .त्यामुळेच बँक प्रगती पथावर आहे .बँकेला अनेक विशेष पुरस्कार मिळाले आहेत .या पुरस्कारांबाबत व बँकेच्या उत्कृष्ठ कामकाजाबाबत संसदीय कामकाजाच्या निमित्ताने अनेक नेते व पदाधिकारी/अधिकारी विचारणा करतात व गौरोदगार काढतात त्यावेळी आपल्या बँकेचा अभिमान वाटतो. बँकेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या असून बँक राष्ट्रीयकृत व व्यापारी/खाजगी बँकांशी स्पर्धा करणेस सक्षम आहे.
या प्रसंगी जिल्हयातील उत्कृष्ठ कामकाज करणा-या विकास संस्थांचा मान्यवरांचे हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करणेत आले .
सभेस बँकेचे संचालक आ. मकरंद पाटील, श्री .प्रभाकर घार्गे, श्री. दत्तात्रय ढमाळ, श्री. राजेंद्र राजपुरे, श्री. प्रदिप विधाते, श्री. शिवरुपराजे निंबाळकर-खर्डेकर, श्री. सत्यजित पाटणकर, श्री. सुनिल खत्री, शेखर गोरे, श्री. ज्ञानदेव रांजणे, श्री. रामराव लेंभे, श्री. सुरेश सावंत, श्री. लहुराज जाधव संचालिका सौ. कांचन साळुंखे, सौ. ऋतुजा पाटील सेवक संचालक श्री. जितेंद्र चौधरी, श्री. संग्रामसिंह जाधव, जिल्हा उपनिबंधक मा. श्री. मनोहर माळी तसेच उपस्थित अन्य मान्यवर लोकप्रतिनिधी, माजी संचालक सदस्य, नाबार्ड साताराचे डी. डी. एम. मा. श्री. राजेंद्र चौधरी, बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक मे. गोगटे आणि कंपनी चे पार्टनर मा. श्री. उमेश गोगटे, बँकेचे कर सल्लागार मा. श्री. तानाजीराव जाधव, वि .का .स .सेवा सोसायटया, अर्बन बँका व पतसंस्था, गृहनिर्माण, ग्राहक व पाणी पुरवठा सहकारी संस्था,सहकारी खरेदी विक्री संघ, साखर कारखाने,दूध संस्था इत्यादि सहकारी संस्थांचे पदाधिकारी/प्रतिनिधी तसेच व्यक्ती सभासद, पत्रकार बंधू उपस्थित होते.
बँकेचे उपाध्यक्ष मा .श्री .अनिल देसाई यांनी सभेस उपस्थित मान्यवर व सभासद प्रतिनिधींचे आभार मानले व सभा संपलेचे जाहीर केले.













