देगावमध्ये पोल्ट्रीमुळे हवा पाणी यांचे प्रदूषण, शेती व जनावरांवरही दुष्परिणाम
![]()
ग्रामसभेचा ठराव होऊनही बेलगाम पोल्ट्री व्यावसायिकावर कारवाई नाहीच
भुईंज / प्रतिनिधी : वाई तालुक्यातील देगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये किकलीतील एका व्यावसायिकाने सुरू केलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये प्रक्रिया उद्योगाद्वारे कोंबडीच्या पिल्लांची उत्पत्ती करण्याचा उद्योग सुरू केला आहे. मात्र त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या दुर्गंधीला सामोरे जावे लागनार आहे. पोल्ट्री फार्मच्या दुर्गंधीमुळे ग्रामस्थ वर्ग हैराण झाले आहेत. प्रदूषण नियंत्रणाच्या नियमावलीला हरताळ फसणाऱ्या या पोल्ट्री व्यवसायिकावर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थातून होत असून ग्रामसभेत ठराव करूनही संबंधित पोल्ट्री मालकावर ठोस कारवाई होत नसल्याने देगाव ग्रामस्थातून नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांसह जनावरांचे आरोग्यही धोक्यात – सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या तलावालगत उभारलेल्या या पोल्ट्री फार्ममुळे ग्रामस्थांचे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होणार आहेत त्यामुळे शेतकरी, पशुपालक व ग्रामस्थांसह जनावरांचेही आरोग्य धोक्यात येणार असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, देगाव गावच्या हद्दीमध्ये किकली येथील एका व्यावसायिकाने कोंबड्यांवर प्रक्रिया करीत पिल्ले निर्मिती करणारी पोल्ट्री उभारली आहे. मात्र संबंधिताचा हा व्यवसाय आजवर दुर्गंधी आणि प्रदूषण वाढवणाऱ्या घटकांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रदूषण नियंत्रणाचे आणि पर्यावरण रक्षणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून हा व्यवसाय सुरू असल्याने ग्रामस्थ विरोधात पोल्ट्री व्यवसायिक असा जणू संघर्ष या परिसराने वेळोवेळी अनुभवला आहे.
पोल्ट्री व्यावसायिकाच्या अरेरावी आणि मनमानीमुळे प्रदूषण वाढत असल्याने आणि त्याचा स्थानिक ग्रामस्थांसह परिसरात उपद्रव होत असल्याने आणि सार्वजनिक विहिरी शेती यावरही दुष्परिणाम झाल्याने अनेकदा देगाव ग्रामस्थांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. ग्रामस्थांचा आक्रोश दिवसेंदिवस अधिकच वाढू लागला असतानाही पोल्ट्री व्यावसायिकावर कारवाई करण्यात यावी यासाठी ग्रामस्थांनी शासन दरबारी अनेकदा पत्रव्यवहार करूनही न्याय न मिळाल्याने देगाव येथील ग्रामस्थांनी चक्क ग्रामसभा घेत ग्रामसभेत आक्रमक पवित्रा घेतला.
खाजगी जागेतून वीज खांब नेण्यास शेतकऱ्यांचा विरोध – शेतकऱ्यांच्या खाजगी क्षेत्रातून विद्युत पुरवठा करणारे खांब उभारून संबंधित पोल्ट्रीस वीजपुरवठा करण्याचा घाट पोल्ट्री मालकांनी घातला होता मात्र ग्रामपंचायतीची परवानगी नसल्याने आणि संबंधित शेतकऱ्यांना न विचारता त्यांच्या खाजगी शेतातून विद्युत खांब रोवण्यास स्थानिकांनी विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर पोल्ट्री चालकाच्या मनमानी आणि बेकायदा कृत्यांना प्रशासनाने लगाम घालावा, अशी मागणीही गावकऱ्यांतून होत आहे.
ग्रामसभेतील ठरावानुसार सर्वानुमते पोल्ट्री बंद करण्याचा ठरावही ग्रामस्थांतर्फे मंजूर करण्यात आला. किकलीतील संबंधित व्यावसायिकाने देगाव ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात व्यवसायासाठी म्हणून कोंबड्यांचे भव्य पोल्ट्री शेड उभारली आहेत. या परिसरात चुकीच्या पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय उभारणाऱ्या व त्याचे संचालन करणाऱ्या संबंधित पोल्ट्री व्यवसायिकावर प्रदूषण पसरवल्या प्रकरणी कारवाई होणार की नाही ? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
संबंधित पोल्ट्री व्यावसायिकाकडे ग्रामस्थांनी विचारणा केली असता “माझे वरपर्यंत हात पोहोचले आहेत. माझे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही” अशी भाषा संबंधित व्यावसायिक वापरतो. प्रशासनाने ही संबंधित पोल्ट्री व्यवसायिकाच्या मनमानी आणि आरेरावीला आळा घालण्यासाठी त्याच्यावर ठोस कारवाई करावी व ग्रामसभेतील ठरावाचा मान राखावा तसेच ग्रामस्थांना होत असणारा दुर्गंधीचा उपद्रव आणि शेती, जनावरे व सार्वजनिक विहिरी या ठिकाणी होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणीही देगाव ग्रामस्थांतून होत आहे.
संबंधित पोल्ट्री गावातील लोकवस्तीच्या अगदीच जवळच असल्याने गावठाणापर्यंत त्याची दुर्गंधी येणार आहे. कोंबडीची विष्टा, स्लरी, मेलेल्या कोंबड्या यांची दुर्गंधी परिसरात मोठ्या प्रमाणात पसरनार आहे. स्लरीमुळे आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याचे स्त्रोत खराब होण्याची शक्यता आहे. मेलेल्या कोंबड्यांमुळे जनावरांना बाधा पोहोचत असते. शिवाय माशांचे व डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे परिसरातील शेतीसुद्धा धोक्यात येणार आहे. ग्रामस्थांनी शासन दरबारी पत्रव्यवहार करूनसुद्धा अद्याप पोल्ट्री व्यवसायिकांवर कोणतीही कारवाईंना न झाल्याने ग्रामस्थ संभ्रमात पडले आहेत.













