Thu, Jan 15, 2026
महाराष्ट्र

गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
Ashok Ithape
  • PublishedAugust 21, 2023

मुंबई, दि. 21 : गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता घरांचा साठा वाढवावा, तसेच ठाणे व राजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देतानाच गिरणी कामगारांच्या घरांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे गिरणी कामगारांच्या प्रश्नांसदर्भात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार धैर्यशील माने, राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, अतुल भातखळकर, सुनील राणे, प्रकाश आबिटकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश आवाडे, माजी आमदार नरसय्या आडम, मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, गोविंदराज, एमएमआरडीएचे मुख्य नियोजनकार मोहन सोनार यांच्यासह गिरणी कामगारांच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, गिरणी कामगारांना, त्यांच्या वारसांना हक्काची घरे मिळाली पाहिजे ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. त्यासाठी कार्यवाहिला गती देण्यात आली असून गेल्या काही महिन्यांत दोन टप्प्यांत गिरणी कामगारांना सदनिकेच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले आहे. गिरणीकामगार, त्यांच्या वारसांनी आता पर्यंत सुमारे १ लाख ७४ हजार अर्ज म्हाडाकडे केले आहेत. त्यांची छाननीप्रक्रिया अधिक गतिमान करण्याचे निर्देश दिले असून ही छाननीप्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पात्र- अपात्र संख्या निश्चित होऊ शकेल.

कोन-पनवेल येथील घरांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, तसेच ठाणे राजगोळी येथील सदनिकांची दुरुस्ती एमएमआरडीएने तातडीने हाती घ्यावी, जेणेकरून त्याठिकाणच्या पाच हजार घरांची लॉटरी काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कोन – पनवेल येथील घरांची सोडतप्रक्रिया पूर्ण करुन कामगारांना दसऱ्यापर्यंत सदनिकांची चावी देण्यात यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत ‘टेक्स्टाईल मिल’ म्युझियमचे काम तातडीने सुरू करावे, अशा सूचना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आल्या. याठिकाणी गिरणी कामगारांच्या मुला-मुलींना काम देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुंबई महानगर क्षेत्रात गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी कल्याण तालुक्यात सुमारे २१ हेक्टर जागा उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले असून त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

प्रधानमंत्री आवास योजनेतून गिरणी कामगारांना घरे देण्याच्या विकल्पाबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले. त्याचबरोबर सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, सातारा येथील मूळ रहिवासी असलेल्या गिरणी कामगारांच्या घरांबाबत त्यांच्या इच्छेनुसार मुंबईबाहेर घरे देण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

गेल्या काही महिन्यांत गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी ज्या गतिमानपणे कार्यवाही सुरू आहे, त्याबद्दल उपस्थित लोकप्रतिनिधी आणि गिरणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!