माजी विद्यार्थिनी संघाचे कन्याशाळेसाठी महत्वाचे योगदान – ॲड. प्रभाकर सोनपाटकी
वाई / प्रतिनिधी :
गेल्या शंभर वर्षात कन्याशाळा वाई मधून अनेक क्षेत्रात दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनी घडल्या आहेत.
सर्वच क्षेत्रात शाळेतील विद्यार्थिनींनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली आहे, फक्त अभ्यास एके अभ्यास असे न करता विविध उपक्रम राबवून सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवणारी कन्याशाळा वाई उपक्रमशील शाळा आहे,या शाळेतून सुजाण नागरिक निर्माण होत आहेत, ही अत्यंत आनंददायी आणि समाधान देणारी बाब आहे,
असे प्रतिपादन महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे संचालक ॲड. प्रभाकर सोनपाटकी यांनी नुकतेच केले.
कन्याशाळा वाई च्या माजी विद्यार्थिनी संघातर्फे शाळेतील गुणवंत विद्यार्थिनींच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
माजी विद्यार्थिनी संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या महर्षी कर्वे पुरस्काराचा देखील त्यांनी उल्लेख करून कौतुक केले.
वाई येथील शताब्दी वर्षात पदार्पण करत असलेल्या कन्याशाळा वाई मध्ये कला, संगीत, क्रीडा, शिष्यवृत्ती, या मध्ये राज्य, राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या, दहावी – बारावी मधील यशाबद्दल,व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून, तसेच बी.सी. ए.होऊन कॅम्पस मधून विविध कंपनी मध्ये निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींना माजी विद्यार्थिनी संघातर्फे सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष अरुण देव,उपाध्यक्ष डॉ.शेखर कांबळे,संचालिका सुनिती गोवगीकर,शाळा समिती सदस्य अविनाश जोशी,अंजली काणे,रश्मी शेवडे,मुग्धा देशपांडे,रमेश कोरडे, प्रशालेच्या माजी शिक्षिका प्रज्ञा कुलकर्णी आदींसह अनेक माजी विद्यार्थिनी, माजी शिक्षक, माजी मुख्याध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत आदर्श मुख्याध्यापिका रुक्मिणीताई भोये, यांनी केले.
सूत्रसंचालन नमिता पाटील यांनी तर आभार मनीषा देशपांडे यांनी मानले.













