पद्मविभूषण श्री. रतन टाटा यांना “उद्योगरत्न ” पुरस्कार प्रदान
मा.पद्मविभूषण श्री. रतन टाटाजी यांना “उद्योगरत्न ” पुरस्कार प्रदान करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, उद्योग मंत्री श्री. उदय सामंत, मुंबई शहर पालकमंत्री श्री. दीपक केसरकर
तसेच उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आज सकाळी त्यांच्या घरी गेले आणि त्यांना मानाच्या “उद्योगरत्न ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर , उद्योगरत्न हा पुरस्कार सुरू केला आहे.
उद्योग विभागाने ह्या वर्षापासून उद्योगरत्न हा पुरस्कार सुरू केला असून श्री रतनजी टाटा हे या पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत.
या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी म्हणाले की आदरणीय रतन टाटांचे कार्य हे हिमालया इतके मोठे आहे. उद्योग मंत्री उदय सामंत जी म्हणाले की रतन टाटाजींनी हा पुरस्कार स्विकारणे ही आम्हा महाराष्ट्रींयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॅा हर्षदीप कांबळे यांनी रतन टाटा यांना देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठीत सन्मानपत्राचा मसुदा वाचून दाखविला . ते म्हणाले की काही व्यवसायकांनी करोडो अरबो रूपये कमावले पण रतन टाटाजी असे एकमेव उद्योजक आहेत ज्यांनी करोडो अरबो लोकांच्या ह्रद्यात स्थान मिळवले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.













