![]()
समजावून घ्या नातं… साप, मुंग्या, वारुळे आणि माणसं…
वारूळ आणि मुंग्यांची झेड सुरक्षा अर्थात नाग.
नागपंचमीत वाचवूया मुंग्या, साप, वारुळे.
नागपंचमी म्हटलं की आपल्यासमोर येतात नागोबा, हा झाला पुरुषांच्या मानसिकतेचा विचार, मात्र स्त्रियांच्या मानसिकतेत नागपंचमी म्हटलं की वारुळाची पूजा, मातीच्या नागाची पूजा, हातावर मेहंदी काढण्याची प्रथा, एकत्रितपणे गाणे गाण्याची प्रथा. माझी आई आजही म्हणते, पाच फडीचा नागोबा ग | माझा गळ्यांवर चढला | माझ्या बांगड्या फोडल्या| माझ्या पायावर चढला जोडवी तोडली| पाच फडीचा नागोबा ग | वारुळाची करणे आणि कथा अशी आहे की, स्त्रिया नागोबाला भाऊ मानतात म्हणून बहिणीने भावाच्या नावे उपवास करायचा अशी प्रथा आहे. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी.
यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून आणि मातीचा नागोबा काढून त्याला दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पूजा करतात. या सणाला विशेषतः: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.
लग्न झालेल्या मुलींची पहिली पंचमी म्हणजे माहेरला जान आणि गान् गाण, झोके बांधून छान प्रकारे खेळ व गाणी म्हणतात..
एका कथेनुसार पूर्वीच्या काळी शेतात नांगरट करत असताना, एका शेतकऱ्याकडून काही नागाची पिल्ले मारली गेली, मग त्याची बायको आली तिने त्या नागोबाची माफी मागितली. मग नागोबाने शेतकऱ्यांला जीवदान दिले. त्यामुळे बहिणीने खूप मोठा उपवास धरायची प्रथा आजही सुरू असून, त्यामुळे शेतकरी भाऊ राया आनंदात व सुरक्षित राहतो.
‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो’, हे हा दिवस साजरा करण्यामागील एक महत्वाचे कारण आहे.
पंचमीच्या आदल्या दिवशी उपवास धरायचा आणि वारुळाला जायचं सोबत ज्वारीच्या लाह्या, दूध, हळदीकुंकू, दोरा, फुल वाहून वारुळाची मनोमन पूजा करायची.
या सणात वारुळातील काही रिकामि बिळ असतात त्याच्यामध्ये दूध ओतायचं आणि पूजा करायची अशी प्रथा आहे, मात्र हे दूध मुंग्यांना उपयोगी पडतं हे यातलं शास्त्रीय कारण.. दिंड निविध, याचा निवध म्हणजे पुरण घालून मस्त पोळी करणे..हा निवध नागोबाला ठेवतात.. कारण मगच नागोबा प्रसन्न होतो, अशी काहीशी भाबडी कल्पना आहे, मात्र यात शास्त्र खूपच मोठे आहे. हाच दिंड मुंग्या खूप आवडीन खातात.
आपल शरीर निरोगी राहण्यासाठी पंचमीत आपल्या हातावर मेहंदी काढतात. कारण मेहंदी शरीरातील उष्णता शोषून घेत असते. शिवाय त्वचा स्वच्छ करण्याचे काम करीत असते, मात्र मेंहदी आपल्या घरासमोरील झाडाची असली पाहिजे, कोणतेही रसायन घातले नसावे. कारण हाताला लावलेली मेहंदी शेवटी हळूहळू पोटात जाते आणि बरेच आजार कमी करीत असते अगदी अनेक प्रकारचे शरीरातील तापासारखे आजार कमी करीत असते. शिवाय चिमण्या अश्या मेहंदीच्या काटेरी झाडांवर खूप छान घरटं करतात आणि रात्र निवारा सुद्धा करतात. यामुळे चिमण्या सुद्धा वाचतील हा सुद्धा एक महत्त्वाचा हेतू आहे.
जैवविविधतेला वाचविण्याची नागपंचमी….नागपंचमी नक्कीच साजरी झाली पाहिजे पण कशी…..साजरी करण्याचे मूळ कारण म्हणजे वारुळे, मुंग्या, सापांना संरक्षण देण्याच्या उदेशाने पूर्वजांनी सुरु केलेली नागपंचमी, नागपंचमी म्हटलं कि समोर येतो नागोबा आणि त्यांचे वारूळ, पूर्वजांनी आपल्याला श्रावण किवा आगष्ट महिन्यात सुरु असलेली नागपंचमीसाठी खूप चांगल्या रूढी परंपरा आखून दिल्या आहेत. मात्र यात आजचा शिक्षित पण बिनडोक मानव यातून काहीच बोध घेताना दिसून येत नाही.
आपण नागपंचमी सन साजरा करताना खऱ्या नागाची पूजा करतो. पूर्वी लोक मातीचे नाग करून त्याची पूजा करायचे आणि हा मातीचा नाग वारुळापुढे ठेऊन करीत असत. आपण याबाबत सविस्तरपणे माहिती घेतल्यास असे लक्ष्यात येईल कि मुंग्या व वाळवी खूप वेगवेगळ्या प्रकारची वारुळे बांधतात अगदी किल्लेच तयार करतात. हे किल्ले अर्थात वारुळे तयार करताना आपल्या तोडतील आम्लयुक्त लाळेचा उपयोग करून जमिनिखालील मातीचा प्रत्येक कण आणि कण उकरून वरील बाजूस आपल्याला दिसणारे वारूळ तयार करतात, मात्र वारूळ हे जमिनीच्या खोलवर असते तेवढेच जमिनीच्या वर असते हे लक्ष्यात ठेवावे.
आता पावसाळ्यात चुकून जर वारुळाची माती वाहिली तर या मातीच्या नागाची माती वापरून मुंग्या डागडुजी करतात, म्हणून मातीचा नाग लोक करायचे. या वारुळात साप कधीतरी राहतो आणि मग शेतकरी किवा एखादा वाटसरू अशी घटना पाहतो आणि मग हे वारूळ नागाचे किवा सापाचे आहे असे जगजाहीर केले जाते. आयत्या बिळात नागोबा अशी जुनी म्हण रूढ आहे, म्हणजेच या म्हणीत सर्व शास्त्र लपलेले आहे, वारूळ आहे मुंग्यांचे मात्र राहतो नागोबा, याचाच फायदा घेत आपल्या पूर्वजांनी नागपंचमी सण सुरु करून एकाचवेळी दोन जिवांना जीवदान दिल्याचे दिसून येते.
नेमके पावसाळ्यात शेताच्या बांधावर किंवा शेतीच्या तालीवर अनेक साप आढळतात, कारण खोलगट शेतात पाणी साचते, मग साप शेताच्या वरच्या भागात आसरा घेतात. मग शेतातील उंदरे बांधावर किंवा तालीवर असलेल्या अथवा वारुळात शिरतात. कधी अधून मधून वारुळात शिरलेल्या उंदरांवरती ताव मारायला नाग आणि धामण शिरतात आणि मग नागोबा प्रत्यक्ष वारुळातून बाहेर पडताना आपल्याला दिसतात, शिवाय इतरही साप बसण्याच्या जागेत पावसाचे पाणी जाते आणि मग बहुतांश वेळा साप रत्यावर किंवा घराच्या कडेला आसरा घेतात, यात साप मारले जाऊ नयेत म्हणून पूर्वजांनी नागपंचमी सन साजरा करण्याचे मोठे शास्त्र जगापुढे निर्माण करून ठेवले असावे.
असा सहज अंदाज बांधता येतो. शिवाय साप दुध पीत नाही किवा शाकाहार करीत नाही हेही त्यांना पक्के माहित होते. मात्र तरीही त्यांनी वारुळापुढे लाह्या, साखर, बत्ताशे, शेगदाणे, तांदूळ, दुध, दही असे नानविध शाकाहारी पदार्थ वारुळापुढे ठेवले जातात, हे तर सर्व अन्न फक्त मुग्याचे आहे. म्हणजे पावसाळ्यात मुग्याना खाद्य मिळावे म्हणून हि तजबीज केल्याचे दिसून येते. शिवाय सापांना हि जीवदान देण्याचे महत्वाचे काम या सणातून होत असते. मात्र शिकेलेली पिढी हुकल्यासारखी करायला लागली आणि त्याला घाणेरडे स्वरूप येऊन सापांची वरात काढणे तर कुठे प्रत्यक्ष पूजा करणे तर कुठे त्याला दुध पाजणे असले आडानी प्रकार शिक्षित समाजात जास्त फोफावत गेले, परिणामी सण बाजूला आणि नको त्या भानगडी समाज्यासमोर येऊ लागल्या. त्यामुळे यापुढे फक्त वारुलांची पूजा करून त्याठिकाणी शाकाहारी निवद ठेवल्यास निसर्ग संवर्धन होणे शक्य होईल.
लाखो मुग्यांचे वारूळ नष्ट करू नये हि पवित्र भावना.
अनेक गावात मोठ मोठे मातीचे नाग करून त्याची सार्वजनिक पूजा सुद्धा केली जाते. ही बाब पर्यावरणास पूरक आहे.
दरवर्षी लाखो उंदरांकडून आपल्या शेतीचे 30%टक्के उत्पादन नष्ट केले जाते अशा उंदरांना नियंत्रित करण्यासाठी साप खूप मोठ्या प्रमाणावरती काम करतात. तर दुसरीकडे मुंग्या पृथ्वीवर जिथं माती तिथ दरवर्षी एक स्क्वेअर किलोमीटर मध्ये 50 टन खत निर्मिती करतात. मुंग्या आणि मधमाशी आणि साप यांचे एकत्रितपणे विचार केल्यास यांच्याशिवाय आपण शेती करूच शकत नाही.
अर्थात सापांना व मुंग्यांना वाचविणे हे महत्वाचे कार्य कालच्या पूर्वजांनी खूप कल्पकतेतून केले आहे, आपणही पुढे हा वसा चालू ठेवूयात. फक्त मातीच्या नागाची पूजा करावी, नक्कीच….सर्वांना एक विनंती आहे कि मांज्या असलेली दोरीने पतंग उडवू नयेत, अनेक निष्पाप जीव जातात अगदी पक्षी, वटवाघळे आणि माणससुद्धा !!
डॉ. महेश गायकवाड, पर्यावरण अभ्यासक बारामती.













