Thu, Jan 15, 2026
स्थानिक बातम्या

किसन वीर’च्या कार्यकारी संचालकपदी जितेंद्र रणवरे

किसन वीर’च्या कार्यकारी संचालकपदी जितेंद्र रणवरे
Ashok Ithape
  • PublishedAugust 19, 2023

दि. १९ ऑगस्ट, भुईंज : भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदी खासगी व सहकारी क्षेत्रातील सत्तावीस वर्षांचा अनुभव असलेले व सहकारातील विविध पुरस्काराने सन्मानित झालेले इंदापुर तालुक्यातील निमसाखर येथील जितेंद्र रणवरे यांनी पदभार स्विकारला.

श्री. रणवरे यांनी आपल्या कामाची सुरूवात अकलुज येथील सहकारी महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यातून क्लार्क या पदावरून केलेली होती. तद्नंतर एक्साईज ऑफिसर, लिगल अॅण्ड मार्केटींग ऑफिसर तर २०११ मध्ये त्यांनी सोलापूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर सेक्रेटरी या पदापर्यंत मजल मारलेली होती.

तेथील कामाचा अनुभव पाहता विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे गंगामाई युनिटवर त्यांना असिस्टंट जनरल मॅनेजर या पदावर नियुक्त करण्यात आले. २०१५ मध्ये मा. साखर आयुक्तांच्या मार्फत घेण्यात आलेल्या कार्यकारी संचालक पदाच्या परिक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले. जुलै २०१६ मध्ये लातुर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर ते कार्यकारी संचालक म्हणून रूजु झालेले होते. याकाळात कारखान्याला विविध पुरस्कार मिळवुन देण्यात त्यांचे महत्वाचे योगदान राहिलेले होते.

किसन वीर कारखान्याची विस्कडलेली आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील व व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ करीत असून सहकार क्षेत्रातील सत्तावीस वर्षांचा अनुभव असणारे जितेंद्र रणवरे यांच्या अनुभवाचा कारखान्यास निश्चितच फायदा होईल.

कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांचा सत्कार कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व माजी उपाध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी केला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, सचिन साळुंखे, रामदास इथापे, हिंदुराव तरडे, किरण काळोखे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!