किसन वीर’ वरील माजी खासदार कै. लक्ष्मणराव जाधव-पाटील स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यासिकेचा लाभ घ्यावा – आमदार मकरंदआबा पाटील
वाई/ प्रतिनिधी
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील कामगार कल्याण मंडळामार्फत चालवित असलेल्या यशवंतराव चव्हाण वाचनालयामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या माजी खासदार कै. लक्ष्मणराव जाधव-पाटील स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यासिकेचा लाभ सभासदांच्या पाल्यांनी घेऊन तालुक्याचे नाव देश व राज्यपातळीवर पोहचवावे, असे आवाहन किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंद आबा पाटील यांनी केले.
यशवंतराव चव्हाण वाचनालयामध्ये माजी खासदार कै. लक्ष्मणराव जाधव-पाटील स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यासिकेचे उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष आमदार मकरंदआबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, संचालक दिलीपबाबा पिसाळ, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री. पाटील बोलत होते.
आमदार पाटील पुढे म्हणाले, किसन वीर कारखान्याप्रमाणेच कारखाना सलग्न असलेल्या संस्थाही अडचणीत आणलेल्या होत्या. कारखान्याप्रमाणे सर्वच संस्थांना उर्जितावस्थेत आणण्याचा आमचा प्रमाणिक प्रयत्न आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने कारखान्याप्रमाणेच या संस्थाही नक्कीच उर्जितावस्थेत येणार आहेत. बंद अवस्थेत असलेले यशवंतराव चव्हाण वाचनालय आपण सुरू केलेले आहे. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाकरिता जवळपास कोठेही ठिकाण नसल्याने परगावी जावे लागत होते.
परंतु आता आपल्या किसन वीर कारखाना कार्यस्थळावर माजी खासदार कै. लक्ष्मणराव जाधव-पाटील स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यासिका सुरू झाल्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना होणारा त्रास कमी होणार आहे. माजी खासदार कै. लक्ष्मणराव जाधव-पाटील स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यासिकेमुळे कार्यक्षेत्रातील विद्यार्थी व विद्यार्थीनी आपल्या तालुक्याचे नाव राज्य व देशपातळीवर नक्कीच पोहचवतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
यावेळी कारखान्याचे चिफ इंजिनिअर एस. जी. सुर्यवंशी, चिफ केमिस्ट, व्ही. एम. गाढवे, इन. डिस्टीलरी मॅनेजर उदयसिंह भोसले, इन्चार्ज को जन मॅनेजर उद्भव शिंगटे, एच. आर. मॅनेजर ए. टी. शिंगटे, लिगल इन्चार्ज शिवाजी फरांदे, परचेस इन्चार्ज संतोष जगताप, सुरक्षा अधिकारी पवनकुमार बाबर, कामगार युनियनचे अध्यक्ष दत्तात्रय शेलार, निलेश भोईटे, भरत भोसले, राजेंद्र जगताप, राघवेंद्र डेरे, किरण फाळके, कामगार कल्याण मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदिप बाबर, किशोर शिंदे, संतोष वाघ, राहुल गायकवाड, कविता ननावरे, ग्रंथपाल पद्मा इथापे, शेतकरी, कर्मचारी आदी उपस्थित होते.













