पंचायतीच्या प्रतिष्ठेपेक्षा मालक ग्रामस्थांच्या घामाच्या पै नी पैची प्रतिष्ठा महत्वाची
![]()
जादा दराने खरेदी झाली नाही हे सिद्ध करा म्हणेल ते ऐकू : बाळासाहेब जाधवराव यांचे आव्हान
भुईंज : ग्रामपंचायतीच्या वतीने खरेदी करण्यात आलेली सीसीटिव्ही यंत्रणा जादा दराने खरेदी झाली नाही हे सिद्ध केल्यास म्हणेल ते ऐकू, असे आव्हान देत हा प्रश्न कोणाच्याही प्रतिष्ठेचा नसून ग्रामस्थांच्या घामाच्या पै आणि पैचा आहे. ग्रामस्थांच्या हितापेक्षा कोणाचीही प्रतिष्ठा महत्वाची नाही, याचे भान सर्वांनी ठेवावे, अशा घणाघाती शब्दात बाळासाहेब जाधव यांनी ठणकावले.
याबाबत ते म्हणाले, आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घेवून जबाबदारीने आमचे म्हणणे मांडले आहे. त्यावेळी व्यक्तिगत कोणावरही आरोप केला नाही. यातील दोषी कोणीही असूूदे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे एवढेच आमचे म्हणणे आहे. उगाच कोणी ते स्वत:वर ओढून घेवू नये. आमच्याकडे असणारे त्याच वस्तुच्या किमतीचे कोटेशन खोटे आहे का? सीसीटिव्ही बंद का आहेत? ते नक्की नवेच आहेत, की जुने सेकंड हँड बसवले आहेत? या प्रश्नांची उत्तरे प्रतिष्ठेचा प्रश्न करणार्यांनी सर्वप्रथम द्यावीत.
सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामपंचायतीत असणारे पदाधिकारी, सदस्य ग्रामस्थांनी निवडून दिले आहेत. त्यांची पहिली बांधिलकी ही ग्रामस्थांशीच असली पाहिजे. आम्ही कोणावरही व्यक्तिगत आरोप केला नसून आमचा आक्षेप आहे तो भ्रष्टाचाराला. त्यामुळे बाजारातील सत्य दर काय आहेत आणि पंचायतीने खरेदी केलेले दर काय आहेत याची तुलना करुन ग्रामस्थांच्या हिताचे बोलणे आवश्यक असताना भलताच सूर कोणी आळवू नये. आमचे कोटेशन खोटे असल्याचे सिद्ध करावे, ग्रामपंचायतीच्या खरेदीत जनतेचा पैसा लुबाडला गेला नसल्याचे सिद्ध करावे आणि मगच बोलावे. उगाच ग्रामस्थांना वार्यावर सोडून, त्यांचे नुकसान करणार्यांना पाठीशी घालू नये, असेही बाळासाहेब जाधवराव, अमित उर्फ पप्पू सूर्यवंशी,तेज बाबर यांनी सांगितले.













